
आरटीओ अधिकाऱ्यांची आज पुण्यात बैठक
पुणे, ता. १२ ः राज्यातील प्रमुख आरटीओ कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची शनिवारी (ता. १३) सकाळी १० वाजता पुण्यातील ‘सीआयआरटी’ या संस्थेत अनौपचारिक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संघटना स्थापन करून रखडलेल्या पदोन्नती, वेतन बाबत चर्चा केली जाणार आहे. मात्र ही बैठक शासकीय नाही. या बैठकीच्या निमित्ताने परिवहन विभागाच्या बैठकीत फूट पडल्याची चर्चा आहे. परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी अशी कोणती बैठक होत असल्याचे माहीत नसल्याचे सांगत आपले हात झटकले आहे. येत्या काही दिवसांत परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या होणार आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याने या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे या बैठकीपासून मोटार वाहन निरीक्षक व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांना दूर ठेवण्यात आले आहे.
पुण्यात होत असलेली बैठक ही शासकीय नाही. त्यामुळे माझ्याकडे या बाबतची कोणतीही माहिती नाही. याची माहिती घेऊन चौकशी केली जाईल.
- विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त, मुंबई
वेतनवाढ व पदोन्नतीसाठी आम्ही ही बैठक बोलविली आहे. चर्चा झाल्यावर मागणीचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला जाईल.
- जयंत पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे