तळेगावात किशोर आवारे यांची हत्या नगरपरिषद कार्यालयासमोर गोळ्या झाडून, धारदार शस्त्रांनी वार किशोर आवारे यांच्यावर गोळ्या झाडून शस्त्राने वार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेगावात किशोर आवारे यांची हत्या
नगरपरिषद कार्यालयासमोर गोळ्या झाडून, धारदार शस्त्रांनी वार
किशोर आवारे यांच्यावर गोळ्या झाडून शस्त्राने वार
तळेगावात किशोर आवारे यांची हत्या नगरपरिषद कार्यालयासमोर गोळ्या झाडून, धारदार शस्त्रांनी वार किशोर आवारे यांच्यावर गोळ्या झाडून शस्त्राने वार

तळेगावात किशोर आवारे यांची हत्या नगरपरिषद कार्यालयासमोर गोळ्या झाडून, धारदार शस्त्रांनी वार किशोर आवारे यांच्यावर गोळ्या झाडून शस्त्राने वार

sakal_logo
By

पिंपरी, ता. १२ : जनसेवा विकास समितीचे प्रवर्तक किशोर गंगाराम आवारे (वय ४९, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांच्यावर शुक्रवारी (ता. १२) दुपारी पावणे दोनच्या सुमारास चार ते पाच मारेकऱ्यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयासमोर हल्ला केला. जखमी अवस्थेतील आवारे यांना सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह आणला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
तळेगाव दाभाडे येथील मारुती मंदिर चौकालगत नगरपरिषदेचे कार्यालय आहे. शुक्रवारी दुपारी आवारे कामानिमित्त नगरपरिषद कार्यालयात आले होते. तिथे दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. ते खाली कोसळल्यानंतर धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये आवारे यांना दोन गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आवारे यांचा जीव जाईपर्यंत आरोपी कोयत्याने वार करत होते. त्यानंतर आरोपी दुचाकीवरून पळून गेले. या घटनेमुळे तळेगाव दाभाडे परिसरात खळबळ उडाली व भितीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर व्यापारी, व्यावसायिकांनी दुकाने व व्यवहार बंद ठेवले.
सोमाटणे फाटा येथील डॉक्टरांनी आवारे यांना मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात आणण्यात आला. रात्री उशिरापर्यंत तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया चालू होती. तणावग्रस्त परिस्थिती पाहता, तळेगाव दाभाडे परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आहे. आरोपी सीसीटिव्हीमध्ये कैद झाले आहेत.
दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी, माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या हत्येची प्रकरणे राज्यभर गाजली होती. गेल्या महिन्यात शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे यांची हत्या झाली आणि आता किशोर आवारे यांची भरदिवसा तळेगाव दाभाडे येथे हत्या झाली. त्यामुळे मावळ तालुका पुन्हा हादरला असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. आवारे यांच्या हत्येमुळे तळेगाव दाभाडेमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

शवविच्छेदनावेळी बंदोबस्त
भोसरी : किशोर आवारे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात आणण्यात आला. त्यामुळे रुग्णालयाच्या आवारात आवारे यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. दरम्यान, रुग्णालय परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कुट्टे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम राजमाने यांनी ‘वायसीएम’मध्ये येऊन भेट दिली व घटनेची माहिती घेतली. शवविच्छेदनापूर्वी सायंकाळी सहाच्या सुमारास मृतदेह ‘स्कॅन’ करण्यात आला. पोलिस बंदोबस्तामुळे रुग्णालयाला छावणीचे स्वरूप आले होते. ‘वायसीएम’ समोरील रस्त्यावर जागोजागी आवारे समर्थकांनी गर्दी केली होती.
---------------------------------------
‘‘माझ्या अनेक यशामध्ये किशोर आवारे यांचे मोठे योगदान आहे. एखादी गोष्ट मनावर घेतली तर; यश मिळेपर्यंत ठामपणे भूमिका घेण्याची त्यांची सवय होती. मी एका सहकारी मित्राला मुकलो.
- संजय ऊर्फ बाळा भेगडे, माजी राज्यमंत्री.

फोटो ः ४२६१९