तातडीच्या कामासाठी क्षेत्रीय कार्यालयांना चार कोटीचा निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तातडीच्या कामासाठी क्षेत्रीय कार्यालयांना चार कोटीचा निधी
तातडीच्या कामासाठी क्षेत्रीय कार्यालयांना चार कोटीचा निधी

तातडीच्या कामासाठी क्षेत्रीय कार्यालयांना चार कोटीचा निधी

sakal_logo
By

पुणे, ता. १२. : शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे रस्त्यात पाणी तुंबणाऱ्या नव्या ठिकाणांचाही शोध पावसाळ्यापूर्वी लागला आहे. त्यामुळे आता या ठिकाणी पाणी तुंबू नये यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी चार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
महापालिकेकडून शहरात पावसाळापूर्व कामे करण्यात येत आहेत. मलःनिसारण विभागाकडून पावसाळी गटारे आणि नाल्यांच्या सफाईचे काम हाती घेतले आहे. तसेच ही कामे करताना शहरात पाणी साचू नये यासाठी या क्षेत्रीय कार्यालय, मलःनिसारण विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग यांची संयुक्‍त बैठक नुकतीच घेण्यात आली. त्यावेळी परिमंडळाच्या उपायुक्तांनी निधीची आवश्‍यकता असल्याचे सांगितले होते.
शहरात अवकाळी पाऊस झाल्यानंतर पाणी साचणाऱ्या १५७ ठिकाणांची यादी मलःनिसारण विभागाने तयार केली आहे. त्यातील, काही ठिकाणी क्षेत्रीय कार्यालयांकडून काम करणे शक्‍य आहे. पण क्षेत्रीय कार्यालयांना आधीच निधी कमी असल्याने या कामासाठी स्वतंत्रपणे निधी द्यावा, अशी मागणी परिमंडळाच्या उपायुक्तांनी बैठकीत केली. त्यानुसार पाच परिमंडळांच्या अंतर्गत येणाऱ्या १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी चार कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांसाठी अंदाजपत्रकात प्रस्तावित केलेल्या निधीतून चार कोटी रुपये वर्गीकरणाद्वारे दिले जाणार आहेत. गेल्या वर्षभरात २०० पेक्षा जास्त पाणी साचणाऱ्या ठिकाणांवर उपाय योजना केल्या. तरीही आता नव्याने १५७ ठिकाणे आढळली आहेत. हा निधी याकामासाठी वापरला जाईल.

पावसाळ्यापूर्वी तातडीची कामे करण्यासाठी पाच परिमंडळांच्या माध्यमातून १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी चार कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. परिमंडळाच्या उपायुक्तांकडून निधीची मागणी केली होती. त्यानुसार आयुक्तांपुढे प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
- महेश पाटील, उपायुक्त, आपत्ती व्यवस्थापन विभाग