
मिळकतकर सवलतीसाठीचे २५ रुपयांचे शुल्क रद्द करा
पुणे, ता. १३ ः महापालिकेच्या मिळकतकरात सवलत घेण्यासाठी नागरिकांना ‘पीटी ३’ अर्जासोबत २५ रुपये शुल्क भरावे लागणार आहेत. हा पुणेकरांवर अन्याय असल्याचा आरोप करत ही अट रद्द करा, अशी मागणी आम आदमी पक्षाने महापालिकेपुढे आंदोलन करत केली. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलनेही हीच मागणी केली आहे.
महापालिकेकडून नागरिकांना मिळकतकरात ४० टक्के करसवलत देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या नागरिकांची सवलत रद्द केली आहे किंवा ज्यांना १०० टक्के कर लावलेला आहे, अशा नागरिकांना ते निवासी मिळकतीमध्ये स्वतः राहत असल्याचा पुरावा देऊन ‘पीटी ३’ अर्ज भरावा लागणार आहे. त्यासाठी २५ रुपये शुल्कही स्वीकारले जाणार आहे. आम आदमी पक्षाने त्याला विरोध करत महापालिकेपुढे आंदोलन केले. या वेळी ‘आप’चे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार, डॉ. अभिजित मोरे, एकनाथ ढोले, किरण कद्रे, सेंथिल अय्यर, सुनीता काळे, वैशाली डोंगरे, साहिल परदेशी, शेखर ढगे आदी उपस्थित होते.
लाखो रुपयांचे उत्पन्न
पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प साडेनऊ हजार कोटींचा असताना ४० टक्के सवलतीसाठी २५ रुपये घेणे योग्य नाही. पीटी ३ अर्जासोबत प्रत्येक नागरिकांकडून २५ रुपये घेऊन त्यातूनही महापालिका ५० लाखांपेक्षा जास्त रक्कम वसूल करणार आहे. त्यामुळे ही जाचक अट रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्बन सेलचे अध्यक्ष नितीन कदम यांनी पत्रकाद्वारे केली आहे.