१२ हजार ६८३ कोटी खर्च अपेक्षीत; भूसंपादनासाठी द्यावे लागणार सात कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१२ हजार ६८३ कोटी खर्च अपेक्षीत; भूसंपादनासाठी द्यावे लागणार सात कोटी
१२ हजार ६८३ कोटी खर्च अपेक्षीत; भूसंपादनासाठी द्यावे लागणार सात कोटी

१२ हजार ६८३ कोटी खर्च अपेक्षीत; भूसंपादनासाठी द्यावे लागणार सात कोटी

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली आणि खडकवासला ते खराडी या मेट्रोच्या विस्तारीकरणाचा डीपीआर महापालिका प्रशासनाने तत्त्वतः मान्य केला आहे. महापालिकेच्या विविध विभागांच्या मान्यतेनंतर तो लवकरच स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. या दोन्ही मार्गांसाठी १२ हजार ६८३ कोटी रुपये खर्च अपेक्षीत असून, त्यापैकी पुणे महापालिकेला भूसंपादनापोटी केवळ सात कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.
पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सर्वंकष वाहतूक आराखड्यानुसार मेट्रोच्या विस्तारीकरणासाठी उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर) सह-सात विस्तारित मार्गांचे डीपीआर महामेट्रोने तयार केला आहे. त्यातील हे दोन प्रस्ताव अंतिम टप्प्यात आलेले आहेत.
सध्या वनाज ते रामवाडी या अंशतः सुरू मेट्रो सेवा झालेल्या मार्गावरील उर्वरित काम अंतिम टप्‍प्यात आहे. हा मार्ग वनाजपासून ते चांदणी चौकापर्यंत असा १.२ किलोमीटर आणि रामवाडीपासून वाघोलीपर्यंत ११.६३ किलोमीटरपर्यंत वाढवला जाणार आहे. यासाठी ३ हजार ६०९ कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे.
खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी या २५.८६ किलोमीटर आणि पौड फाटा-वारजे-माणिकबाग हा ६.११ किलोमीटर असा एकूण ३१.९८ किलोमीटर लांबीच्या नवा मार्ग महामेट्रोने प्रस्तावित केला आहे. यासाठी एकूण ९०७४.२४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा प्रस्ताव महापालिकेचा डीपी सेल, लेखा व वित्त विभाग, मालमत्ता विभाग, बांधकाम परवाना विभाग, शहर अभियंता कार्यालय, दक्षता विभाग, अतिरिक्त आयुक्त कार्यालयामार्फत आयुक्तांकडे मान्यतेसाठी येणार आहे. त्यानंतर स्थायी समिती व मुख्य सभेमार्फत हा प्रस्ताव राज्य व केंद्राकडे पाठवला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितेल.

महापालिकेवर आर्थिक भार नाही
केंद्र व राज्याकडून प्रत्येकी २० टक्के रक्कम या प्रकल्पासाठी दिली जाणार आहे. उर्वरित ६० टक्के रक्कम ही वित्तीय संस्थांकडून कर्जाच्या स्वरूपात उभारली जाईल. या कर्जाची जबाबादारी महामेट्रोकडे असणार असून, महापालिकेला खर्च करावा लागणार नाही. केवळ भूसंपादनासाठी दोन्ही मार्गासाठी प्रत्येकी २४ लाख आणि ६.७७ कोटी असे एकूण कोटी रुपये महापालिकेला द्यावे लागणार आहेत.

असा आहे मेट्रो मार्ग
वनाज ते चांदणी चौक - १.२ किमी
रामवाडी ते वाघोली - ११.६३ किमी
खर्च - ३६०९ कोटी
खडकवासला ते खराडी - २५.८६ किमी
पौड फाटा ते माणिकबाग - ६.११ किमी
खर्च - ९०७४ कोटी