पुण्यात काँग्रेस पक्षाकडून जल्लोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात काँग्रेस पक्षाकडून जल्लोष
पुण्यात काँग्रेस पक्षाकडून जल्लोष

पुण्यात काँग्रेस पक्षाकडून जल्लोष

sakal_logo
By

पुणे, ता. १३ : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने मिळविलेल्या विजयाचा शहर जिल्हा काँग्रेस समितीच्यावतीने लाडूवाटप करून जल्लोष करण्यात आला. काँग्रेस भवन येथे पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हनुमानाची आरती करत ढोल-ताशाच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला.

दरम्यान, शिवाजीनगर गावठाण येथील हनुमान मंदिरात काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेत्यांनी हनुमानाची आरती केली. या वेळी उपाध्यक्ष मोहन जोशी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार रवींद्र धंगेकर, रमेश बागवे, ॲड. अभय छाजेड, दीप्ती चवधरी, वीरेंद्र किराड आदी उपस्थित होते.

उल्हास पवार म्हणाले, ‘‘भाजपने साम,दाम, दंड, भेदाचा वापर करून कर्नाटकाची निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला. आपल्या सरकारचा भ्रष्टाचार झाकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४० सभा घेतल्या. धर्माचा वापर करून मते मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्नाटकातील जनतेने त्यांना नाकारले. काँग्रेसने महागाई, बेरोजगारी या विषयांवर प्रचार केला. पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रियांका गांधी आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे सर्व नेते व कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध प्रचार करून यश मिळविले.’’

शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, ‘‘कर्नाटकमध्ये काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी पक्ष संघटना मजबूत करून कार्यकर्त्यांना ताकद दिली. भाजपच्या प्रचार यंत्रणेच्या तोडीला आपल्याही पक्षाची यंत्रणा सज्ज केली. राहुल गांधी यांनी काढलेली ‘भारत जोडो यात्रा’ आणि प्रियांका गांधी यांच्या सभांमुळे पक्षाला यश मिळाले.’’

दक्षिणेतील राज्यांत जेव्हा काँग्रेसला यश मिळते, तेव्हा देशात काँग्रेसची लाट येण्यास सुरुवात होते. हा इतिहास आहे. ईडीद्वारे देशात भयावह वातावरण निर्माण करणाऱ्या मोदी सरकारला उघडपणे नव्हे, तर मतपेटीद्वारे आपण विरोध करू शकतो. हा संदेश कर्नाटकच्या जनतेने दिला.
- अनंत गाडगीळ, प्रवक्ते, कॉँग्रेस

४२७७६