‘गो-ग्रीन’ योजनेत पुणे परिमंडलाची राज्यात आघाडी

‘गो-ग्रीन’ योजनेत पुणे परिमंडलाची राज्यात आघाडी

पुणे, ता. १४ : वीजबिलासाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडणाऱ्या पुणे परिमंडलातील पर्यावरणस्नेही वीजग्राहकांच्या संख्येने एक लाखाचा टप्पा गाठला आहे. महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेअंतर्गत पुणे परिमंडलाने राज्यात आघाडी घेतली असून या योजनेमुळे एक लाख सात वीजग्राहकांची तब्बल एक कोटी २० लाख ८४० रुपयांची वार्षिक बचत होत आहे.
फेब्रुवारीपासून या योजनेमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या सात हजार १९४ वीजग्राहकांची भर पडली आहे. राज्यात तीन लाख ८७ हजार ७५७ वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभाग घेतला आहे. यामध्ये पुणे परिमंडलामध्ये सर्वाधिक १ लाख ७, कल्याण- ४२ हजार २१४ व भांडूप परिमंडलामध्ये ३७ हजार ३९६ ग्राहकांचा समावेश आहे.
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेनुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे. वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते ‘गो-ग्रीन’मधील ग्राहकांना ई-मेलद्वारे पाठविण्यात येते. सोबतच एसएमएसद्वारे देखील वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना ‘प्रॉम्ट पेमेंट’चा लाभ घेणे शक्य होत आहे.
वीजग्राहकांना गो-ग्रीन योजनेचा पर्याय निवडण्यासाठी महावितरणचे मोबाईल अ‍ॅप किंवा www.mahadiscom.in संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे. गो-ग्रीन योजनेत सहभागी झालेल्या वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील ११ महिन्यांचे वीजबिले मूळ स्वरूपात उपलब्ध आहेत. आवश्यकतेप्रमाणे वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे.

समृद्ध पर्यावरणासाठी गो-ग्रीन योजना काळाची गरज आहे. ग्राहकांसाठी चालू व मागील वीजबिल, भरणा तसेच मासिक वीज वापर आदींची माहिती महावितरणच्या मोबाईल ॲप व वेबसाइटवर उपलब्ध आहे. त्यामुळे कागदी मासिक बिलाचा वापर बंद करून या योजनेत जास्तीत-जास्त वीजग्राहकांनी सहभागी व्हावे.
- राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल

पुणे शहरातील ५३ हजार २७३ ग्राहक सहभागी
पुणे परिमंडल अंतर्गत पुणे शहरात ५३ हजार २७३ ग्राहक गो-ग्रीन योजनेत सहभागी झाले आहेत. यामध्ये हडपसर-१ उपविभागामधील सहा हजार ५०, वडगाव धायरी- पाच हजार १८४, धनकवडी- चार हजार ९००, औंध- चार हजार ३६५ आणि विश्रांतवाडी उपविभागामध्ये ३ हजार ८५७ ग्राहकांची संख्या लक्षणीय आहे. पिंपरी चिंचवड शहरात ‘गो-ग्रीन’मध्ये २९ हजार २०५ वीजग्राहक सहभागी झाले आहेत. यामध्ये सांगवी उपविभागातील सर्वाधिक ९ हजार ४२, चिंचवड -५ हजार ६६१ आणि आकुर्डी- ५ हजार ५२५ मोठ्या संख्येने योजनेत सहभागी आहेत. तसेच पुणे ग्रामीण मंडल अंतर्गत आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व हवेली तालुक्यामध्ये १७ हजार ५२९ ग्राहकांनी गो-ग्रीनमध्ये सहभाग घेतला आहे. यामध्ये हडपसर ग्रामीण उपविभागातील ४ हजार ७१२ वीजग्राहकांची सर्वाधिक संख्या आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com