
कबीर पटेल यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
पुणे, ता. १४ ः छायाचित्रकार हा प्रेक्षक, रसिक आणि स्थळ यांच्यामधील दुवा असतो. अनुभवी छायाचित्रकाराच्या एका ‘क्लिक’मध्ये अवघे विश्व सामावलेले असते, असे मत ज्येष्ठ छायाचित्रकार सतीश पाकणीकर यांनी व्यक्त केले. मुक्त छायाचित्रकार कबीर पटेल यांच्या २५ वर्षांच्या भटकंतीत त्यांनी काढलेल्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पाकणीकर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. पाकणीकर यांनी छायाचित्र काढून या प्रदर्शनाचे अनोख्या पद्धतीने उद्घाटन केले. याप्रसंगी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा प्रा. डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, अभिनेत्री भाग्यश्री देसाई, प्रमिला पटेल, आर. एस. जोगळेकर, कमलकांत वडेलकर आदी मान्यवर उपस्थित होते. हे प्रदर्शन सोमवारपर्यंत (ता. १५) सकाळी १०.३० ते रात्री ८ या वेळेत बालगंधर्व कलादालनात रसिकांसाठी विनामूल्य खुले आहे.
‘प्रेरक सुवचने सुलेखन’ प्रदर्शनाचे आयोजन
पुणे, ता. १४ ः बुक क्लब, क कॅलीग्राफी आणि शशिकला फाउंडेशन, पुणे यांच्यातर्फे ‘प्रेरक सुवचने सुलेखन’ या विषयावर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (ता. १६) व बुधवारी (ता. १७) बालगंधर्व कलादालनात हे प्रदर्शन होणार आहे. समाजातील विविध मान्यवर यशस्वी व्यक्तींची सुवचने यात पाहायला मिळतील. मराठी भाषेची आवड जोपासणे आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे बुक क्लबचे संस्थापक अविनाश निमसे यांनी सांगितले.
‘आधुनिक महाराष्ट्रातील धर्मचिंतन’ विशेषांकाचे प्रकाशन
पुणे, ता. १४ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागातर्फे ‘आधुनिक महाराष्ट्रातील धर्मचिंतन’ (१९वे आणि २०वे शतक) या दोन विशेषांकाचे प्रकाशन बुधवारी (ता. १७) होणार आहे. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतील संत ज्ञानेश्वर सभागृहात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होईल. यानिमित्त ‘धर्म - काल, आज आणि उद्या’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी आदी उपस्थित राहणार आहेत.