
पुणे शहरातील चर्चमध्ये मातृदिन उत्साहात साजरा
पुणे, ता. १४ ः शहरातील विविध भागांमधील चर्चमध्ये रविवारी मातृदिन उत्साहात साजरा करण्यात आला. मातेचे प्रेम व वात्सल्याविषयी प्रवचन आणि मातांचा खास सन्मान करून शहरातील विविध चर्चमध्ये मातृदिन साजरा करण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी येणाऱ्या मातृदिनानिमित्त शहरातील विविध भागातील चर्चमध्ये मातृभक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बहुतांश चर्चमध्ये धर्मगुरुंनी मातेच्या प्रेम व वात्सल्याबाबत प्रवचन दिले. त्यानंतर उपस्थित मातांना गुलाब पुष्प, मिठाई व खास बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. ख्राईस्ट चर्च (रास्ता पेठ), चर्च ऑफ द होलीनेम (गुरुवार पेठ), सेंट मॅथ्युज चर्च (डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता), देशपांडे चर्च (कसबा पेठ), इमॅन्युअल चर्च (महात्मा फुले पेठ), सेंट मेरी चर्च (खडकी), मेथडीस्ट मराठी चर्च, सेंट मेरी चर्च (पुलगेट), सेंट क्रिस्पीन्स मराठी चर्च (कर्वे रस्ता) या चर्चमध्ये मातृदिन साजरा करण्यात आला. धर्मगुरु रेव्हरंड संजय ठाकूर, अभिषेक विवेक रोगर्स, चंद्रशेकर जाधव, सुधीर पारकर, सुधीर गायकवाड, फ्रान्सीस कसबे, मनोज काटे, सुधीर चव्हाण, पराग लोंढे आदी धर्मगुरुंनी आपल्या चर्चमध्ये महिलांचे उत्स्फुर्तपणे स्वागत केले, अशी माहिती ‘चर्च ऑफ द होलीनेम’चे सचिव सुधीर चांदेकर यांनी दिली.