
छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन
पुणे, ता. १४ : छत्रपती संभाजी महाराज यांची ३६६ वी जयंती रविवारी (ता. १४) शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. विविध संस्था-संघटनांतर्फे संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.
‘संभाजी ब्रिगेड, पुणे’ यांच्यातर्फे डेक्कन कॉर्नर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. ‘‘छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचे स्मरण आपण सर्वांनी केले पाहिजे. त्यांचा इतिहास पुढील पिढीला समजला पाहिजे,’’ असे सांगत छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील महाराजांचा पुतळा सर्वांसाठी लवकरात लवकर खुला करावा, अशी मागणी या वेळी शहराध्यक्ष अविनाश मोहिते यांनी केली. या प्रसंगी कार्याध्यक्ष अविनाश घोडके, पर्वती विभागप्रमुख व्यंकट मानपिडे, समाधान घोडके, रंजीत लंगर, नागेश कसबे, वैभव घोडके, प्रदीप घोडके आदी उपस्थित होते.
स्वराज्य संघटनेतर्फे डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून महाराजांना अभिवादन करण्यात आले. या वेळी ‘जय भवानी जय शिवाजी,’ ‘धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय,’ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आदी घोषणा देण्यात आल्या. ‘‘छत्रपती संभाजी महाराज ज्याप्रमाणे अनेक क्षेत्रांमध्ये पारंगत होते, त्याप्रमाणे आजच्या तरुणांनी आधुनिक क्षेत्रांमध्ये पारंगत व्हावे,’’ असे मत स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव यांनी व्यक्त केले. या प्रसंगी गणेश सोनवणे, सोमनाथ ढोले, गौतम जाधव, प्रणय शेंडे, प्रवीण भोसले यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.