
वढू, तुळापूर भळभळती जखम
पुणे परिसर : भाग ४५
वढू, तुळापूर भळभळती जखम
शिवरायांनी उभ्या केलेल्या स्वराज्यावर त्यांच्या पश्चात खुद्द औरंगजेब चालून आला, प्रचंड मोठी फौज त्याच्या सोबत होती. पहिल्या तीन वर्षात त्यानी कुतुबशहा आणि आदिलशहा यांचा पूर्ण पराभव केला आणि आता मराठ्यांचा पराभव करून संपूर्ण हिंदुस्थानावर मोगली कब्जा प्रस्थापित करायचा, असे ठरवून तो स्वराज्यावर चालून आला. बलाढ्य औरंगजेब चालून आला या गोष्टीचा फायदा उठवण्यासाठी सिद्धी आणि पोर्तुगीज पण सरसावून उठले. असे सगळीकडून शत्रू चालून येत होते, महाराजांनंतर स्वराज्याची घडी बसलेली नव्हती. अशा संकट समयी एखादा घाबरून गेला असता, पण भीती हा शब्दच माहीत नसलेले संभाजी राजे हे स्वराज्याचे द्वितीय छत्रपती होते. त्यांनी अत्यंत साहसाने चहूबाजूच्या शत्रूंना आपल्या तलवारीचे पाणी पाजले. असा हा शूर, धाडसी राजा दुर्दैवाने औरंगजेबाच्या हाती सापडला, त्याने त्यांना अनेक अमिषे दाखवली, भीती दाखवली, हाल हाल केले पण हा नरसिंह बधला नाही. अखेर ११मार्च १६८९ रोजी या जिगरबाज राजाचा मृत्यू झाला. ही मराठा इतिहासातील एक बरी न होणारी जखम आहे. त्यांचा मृत्यू वढू बुद्रूक येथे झाला. नंतर त्यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी या ठिकाणी त्यांची समाधि आणि वृंदावन बांधले. आज ही समाधी असंख्य इतिहास प्रेमी आणि संभाजी महाराजांच्या भक्तांना प्रेरणा देत आहे. इथे शेजारीच कवी कलश यांचीसुद्धा समाधी आहे. तसेच संभाजी महाराजांच्या आयुष्यातील काही प्रसंग चितारलेले एक छोटे चित्ररूप संग्रहालयही आहे. संभाजी महाराजांनी रामसिंग यास लिहिलेले एक पत्र इथे लावलेले आहे. यात त्यांच्या करारी स्वभावाची झलक दिसते. जवळच भीमा, भामा आणि इंद्रायणी यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले संगमेश्वर आणि इतर अनेक मंदिरे असलेले तुळापूर हे पुरातन गाव आहे. इथेही भेट देता येईल.
काय पहाल?
- संभाजी महाराज समाधी, कवी कलश समाधी, छोटेसे चित्र प्रदर्शन, तुळापूर येथील संगमेश्वराचे पुरातन मंदिर आणि इतर मंदिरे, तीन नद्यांचा संगम
कसे जाल?
- पुण्याहून बसने किंवा खासगी वाहनाने जाता येते.