
लोणीसह तळेगाव, चिंचवड रेल्वे मालधक्क्यांचा होणार विकास
पुणे, ता. १५ ः पुणे रेल्वे विभागातील मालवाहतूक वाढावी म्हणून मालधक्क्याचा विकास केला जाणार आहे. यात लोणी, तळेगाव व चिंचवड स्थानकावरच्या मालधक्क्याचा समावेश केला असून, या तिन्ही ठिकाणी नवी लाइन टाकली जाणार आहे. त्यामुळे मालाचे लोडिंग व अनलोडिंग (माल भरणे आणि उतरवणे) करणे सोपे जाणार आहे. या तिन्ही मालधक्क्यांच्या विकासासाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पैकी लोणी स्थानकाच्या मालधक्क्यासाठी ४७ कोटींचा खर्च अपेक्षित असून, त्यासाठी जागेची मोजणी सुरू झाली आहे.
पुणे रेल्वे विभागात रोज सुमारे ८० मालगाड्या धावतात. दौड- पुणे- लोणावळा मार्गावर रोज सुमारे ६० मालगाड्या धावतात. लोणी मालधक्क्यावर रोज २ मालगाड्यांमध्ये माल भरला जातो, तर ३ मालगाड्यांमधून उतरविला जातो. लोणीला बीटीपीएन व एनएमजी प्रकारच्या मालगाड्या येतात. मात्र सद्यःस्थितीत असणाऱ्या ट्रॅकची लांबी कमी असल्याने येथे मालगाडी आल्यावर त्याची दोन भागांत विभागणी केले जाते. माल उतरवताना अनेक अडचणी येतात. वेळ खूप वाया जातो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी असलेल्या ट्रॅकचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळी ट्रॅकच्या शेजारच्या परिसराचादेखील विकास केला जाणार आहे. यासह तळेगाव व चिंचवड स्थानकाजवळदेखील मालधक्क्यासाठी स्वतंत्र लाइन टाकली जाणार आहे. तळेगावसाठी ३५ कोटी व चिंचवडसाठी १८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तीन मालधक्क्यांच्या विकासासाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
पुणे विभागातील लोणी, तळेगाव व चिंचवडच्या मालधक्क्यांचा विकास केला जाणार आहे. त्यासाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. लोणीच्या मालधक्क्यासाठी जागेच्या मोजणीचे काम सुरू आहे.
डॉ. स्वप्नील नीला, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक, पुणे