‘नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व जगमान्य’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व जगमान्य’
‘नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व जगमान्य’

‘नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व जगमान्य’

sakal_logo
By

पुणे, ता. १५ : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व जगमान्य झाले आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे देखील पंतप्रधान मोदी यांच्याशी बोलण्यासाठी आतूर असतात,’’ असे सांगून, ‘‘मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेले विकासपर्वचे काम कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन पोचवावे,’’ असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले. कर्नाटकच्या विजयावर आनंद व्यक्त करणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे, असा टोलाही यावेळी फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.
शहर भाजपच्या ‘घर चलो’ या संपर्क अभियानाचा शुभारंभ आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाले. त्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना फडणवीस बोलत होते. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, राहुल कुल, सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, मेधा कुलकर्णी, बापू पठारे, प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी, राजेश पांडे, चिटणीस वर्षा डहाळे यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, ‘‘देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने सर्वाधिक गतीने विकास केला. कोरोना काळानंतर अनेक देश मंदीच्या सावटाखाली आहेत. पण आपला देश विकासाच्या वाटेवर आजही मार्गक्रमण करत आहे. त्यामुळे विकसित देश देखील आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहात आहे.’’
कर्नाटक निवडणुकीतील विजयावर विरोधक आनंदोत्सव साजरा करत आहेत, त्यावर फडणवीस म्हणाले, ‘‘आज विरोधकांनी कितीही आनंदोत्सव साजरा केला तरी आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्व जागांवर भाजप विजय होईल.’’
पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘भाजपमध्ये कार्यकर्त्यांचे मूल्यमापन नेहमीच होत असते. कोरोना काळात पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरून काम करत होता.’’
यावेळी ओबीसी आघाडीचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी ही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष मुळीक यांनी केले.‌तर स्वागत गणेश घोष यांनी केले.
-------------