मिळकतकर बिल ऑनलाइन उपलब्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिळकतकर बिल ऑनलाइन उपलब्ध
मिळकतकर बिल ऑनलाइन उपलब्ध

मिळकतकर बिल ऑनलाइन उपलब्ध

sakal_logo
By

पुणे, ता. १५ ः पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागाने पहिल्याच दिवशी तब्बल सात लाख ६० हजार मिळकतकरधारकांची बिल ऑनलाइन उपलब्ध करून दिली. तर १९ मेपासून सर्व मिळकतकरधारकांना ऑनलाइन समवेतच एसएमएस, पीएमसी व्हॉटस्‌ॲप, बॉट आणि प्रत्यक्षात टपालाद्वारे बिले पाठविण्यात येणार आहेत.
राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिकेने २०१९ पासून नागरिकांना मिळणारी मिळकत करातील ४० टक्के सवलत काढली होती. त्यानंतर नव्याने आकारणी झालेल्या मिळकतींना, तसेच जीआयएस सर्वेक्षणात आढळलेल्या सुमारे एक लाख ६५ हजार मिळकतींना शंभर टक्के कर आकारणीवर भर दिला होता. त्याबाबत नागरिकांमध्ये संताप होता. दरम्यान, कसबा विधानसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारने ४० टक्के सवलत पूर्ववत करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, त्यास मंजुरी मिळत नव्हती. दरम्यान राज्य सरकारचा निर्णय एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात आल्यानंतर दरवर्षी एक एप्रिल या आर्थिक वर्षापासून सुरू होणारे मिळकत कराचे बिलिंग करण्यात तांत्रिक अडचण निर्माण झाली. पूर्वीप्रमाणे ४० टक्के सवलतीसोबतच सर्वच बिलांमध्ये देखभाल दुरुस्तीच्या वजावटीमध्ये १५ ऐवजी १० टक्के असा बदल करण्यासाठी संगणक प्रणालीमध्ये बदल करावा लागला. त्यामुळे प्रशासनाने १५ मेपासून २०२३-२४ यावर्षीची बिले तयार करण्यास तसेच ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार १४ मे रोजी रात्री प्रशासनाने तब्बल सात लाख ६० हजार बिले ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहेत.

कर निरीक्षकांकडे पीटी फॉर्म भरून द्यावेत
संबंधित मिळकत कर बिलांसह समाविष्ट गावांची बिल देखील येत्या काही दिवसांत ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच प्रत्यक्षात बिल ३१ मेपर्यंत नागरिकांना पाठविण्यात येणार आहेत. यावर्षी ३१ जुलैपर्यंत मिळकत कर भरणाऱ्या नागरिकांना ३१ जुलैपर्यंत सर्वसाधारण करामध्ये ५, १० आणि १५ टक्के सूट देण्यात येणार आहे. २०१९ पासून आकारणी झालेल्या मिळकत धारकांनी तसेच समाविष्ट गावांतील नागरिकांनी १५
नोव्हेंबरपर्यंत लगतच्या क्षेत्रिय कार्यालय, कर निरीक्षकांकडे पीटी फॉर्म भरून द्यावेत, असे आवाहन कर आकारणी व संकलन विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांनी केले आहे.