
रखडलेली शिक्षकभरती लवकर पूर्ण करण्याची मागणी
पुणे, ता. १६ : राज्य सरकारने एकाच टप्प्यात ५५ हजार शिक्षकांची भरती करून अभियोग्यताधारकांना न्याय द्यावा. भरती प्रक्रियेतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मुलाखत प्रक्रिया रद्द करून थेट मेरिटनुसार नियुक्ती द्यावी, अशी मागणी अभियोग्यताधारकांकडून करण्यात आली आहे.
शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात ८० टक्के शिक्षक भरती तत्काळ करणार असल्याचे सांगितले होते. परंतु अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेऊनही जवळपास दोन महिने पूर्ण झाले. तरीदेखील अद्यापही शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे उच्चशिक्षित बेरोजगार अभियोग्यताधारक उमेदवारांकडून मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये अभियोग्यताधारक उमेदवांराकडून अशा प्रकारचे मागण्यांचे निवेदन देण्यात येत असल्याचे संदीप कांबळे यांनी सांगितले.
शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी, जाहिरातीतील सर्व प्रवर्गांना आरक्षणाच्या टक्केवारीनुसार जागा विभागून द्याव्यात, निवड यादी सोबतच प्रतीक्षा यादीदेखील लावावी, एकदा पवित्र पोर्टलमार्फत निवड होऊन नोकरी मिळालेल्या उमेदवारांना पुन्हा नोंदणी करण्याची संधी देऊ नये, अशी मागणी अभियोग्यताधारक उमेदवारांनी केली आहे.