देशसेवेसाठी तरुणांनी एकत्रित काम करा

देशसेवेसाठी तरुणांनी एकत्रित काम करा

पुणे, ता. १६ : ‘‘जगातील सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. त्यामुळे देशातील तरुणांकडून अधिकाधिक अपेक्षा केल्या जाणं हे साहजिकच. मग या अपेक्षा पूर्ततेसाठी तरुणांनीही आपण निवडलेल्या क्षेत्रात १०० टक्के झोकून देऊन काम करावे. देशाप्रती, समाजाप्रती जबाबदारी म्हणून तरुणांनी देशाला भेडसावणारी आव्हाने स्वीकारून, त्यावर उपाय शोधून एकत्रितपणे काम करायला हवे,’’ असा सल्ला राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी ‘यिन समर युथ समेट’च्या समारोपप्रसंगी युवकांना दिला.
‘सकाळ’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे (यिन) आयोजित दोन दिवसीय ‘यिन समर युथ समेट २०२३’ची सांगता मंगळवारी झाली. याप्रसंगी खासदार वंदना चव्हाण, आमदार रवींद्र धंगेकर यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. समारोप कार्यक्रमात महाएनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडादेखील उपस्थित होते.
कार्यक्रमात चव्हाण म्हणाल्या,‘‘भारत हा जगातील सर्वांत तरुण देश आहे. त्यामुळे संपूर्ण जग हे आपल्या देशाकडे मोठ्या आशेने पाहत आहे. जगातील सर्वांत जास्त लोकसंख्या असणारा आपला देश आहे. लोकसंख्या वाढणे ही समस्या समजायची की गुण हे कळत नाही! परंतु लोकसंख्या वाढल्यामुळे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेकडे जगाचे लक्ष लागलेले असते. अशा देशात गुंतवणूक करण्यासाठी अनेक देश उत्सुक असतात. अशा परिस्थितीत तरुणांनी देशातील आव्हानात्मक गोष्टींवर एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे.’’
‘यिन’च्या माध्यमातून ‘सकाळ’ने देशाला घडवू पाहणाऱ्या समविचारी मुला-मुलींना एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण काम केल्याचा उल्लेखही चव्हाण यांनी केला. त्या म्हणाल्या, ‘‘जगाला सध्या हवामान बदलाची समस्या भेडसावत आहे. याचा सर्वाधिक फटका भारत आणि बांगलादेशाला बसणार आहे, अशी माहिती काही वर्षांपूर्वीच विविध अहवालांतून समोर आली. हवामान बदलाची झळ आता आपण सोसत आहोत. भविष्य काळात लहान मुलांना शाळेत जाताना दप्तरात वह्या-पुस्तके, पाण्याची बाटली, डब्बा याबरोबरच ‘ऑक्सिजन सिलेंडर’ द्यावा लागेल. ही परिस्थिती येऊ नये, असे वाटत असल्यास आजच्या तरुणांनी एकत्र येऊन पर्यावरण संवर्धनासाठी योगदान दिले पाहिजे.’’ तरुणांनी त्यांना हव्या त्या क्षेत्रात १०० टक्के योगदान देण्याच्या हेतूने राजकारणात उतरायला हवे, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
तरुणांचे प्रबोधन करण्याचे काम ‘सकाळ’च्या ‘यिन’ व्यासपीठाच्या माध्यमातून होत असल्याचे धंगेकर यांनी या वेळी सांगितले. ते म्हणाले, ‘‘देशाची उभारणी ही खडतर परिश्रम, त्याग यातून झाली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यातही तरुणांचे योगदान वैशिष्ट्यपूर्ण होते, हे आपल्याला माहीत आहे. परंतु आता देशाला अधिकाधिक सक्षम बनविण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यायला हवा. तरुणांनी दररोज अर्धा तास देशासाठी दिला पाहिजे. तळागळातील माणसांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करायला हवा. देशाच्या वाटचालीत महत्त्वाचा वाटा आपापल्यापरीने उचलला जावा. देशाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर काम करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे.’’ हा दोन दिवसीय कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडलेल्या सदस्यांचा सत्कार या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

जोश, उत्साह आणि जल्लोष याचा त्रिवेणी संगम म्हणजेच ‘सकाळ यिन समर युथ समिट’. दोन दिवसीय समिटमध्ये झालेल्या भरगच्च कार्यक्रमांमधून एक युवक म्हणून मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. माझ्यासारख्या युवकांच्या अंतर्मनात बदल करण्यासाठी हे समिट नक्कीच महत्त्वपूर्ण आणि मार्गदर्शक ठरेल.
- अभिषेक आटोळे, डी. वाय. पाटील महाविद्यालय, आकुर्डी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com