
‘गुरुवारी पाणी बंद’ उद्यापासून लागू
पुणे, ता. १६ ः खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठ कमी होत असल्याने व पाऊस कमी पडण्याची शक्यता गृहीत धरून पाणी बचतीसाठी महापालिकेने दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी १८ मे पासून होत आहे. मात्र, शुक्रवारपासून संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा पुन्हा सुरळीत करण्याचे आव्हान पाणी पुरवठा विभागापुढे आहे. जलवाहिनीतील हवेचा दाब काढून टाकण्यासाठी जवळपास २० एअर वॉल्व्ह बसविण्यात आले आहेत.
एल निनोच्या प्रभावामुळे यंदाच्या मॉन्सूनच्या प्रवासात अडथळे निर्माण होऊन सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचा परिणाम पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणी कमी झाल्यास तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल. त्यामुळे राज्य सरकारने गेल्या महिन्यात बैठक घेत पाणी बचतीसाठी उपाय योजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. खडकवासला धरण प्रकल्पात मंगळवारी (ता. १६) ८.८१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे, हे पाणी ३१ ऑगस्टपर्यंत करायचा असल्याने महापालिकेने पाणी कपात सुरू केली आहे.
पुणे शहरातील पाणी पुरवठा दर गुरुवारी बंद ठेवल्यास एका महिन्यात ०.२५ टीएमसी पाण्याची बचत होते. साधारपणे ही १५ टक्के पाणी कपात आहे. येत्या गुरुवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होत आहे. मात्र, वितरण व्यवस्थेतील दोषांमुळे शुक्रवार, शनिवार हे दोन दिवस काही भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण होते. तेथील नागरिकांना सलग तीन दिवस पाणी मिळत नाही, हे लक्षात घेऊन प्रशासनाने उपाय योजना सुरू केल्या आहेत.
हवेचा दाब काढण्यासाठी वॉल्व्ह
ज्या भागात चढ आहे किंवा जलवाहिनी वळविण्यात आली आहे अशा ठिकाणी जलवाहिनीत हवेचा दाब वाढतो आणि पाणी प्रवाह थांबतो. महापालिकेने असे वारजे, हिंगणे होम्स कॉलनी शिवाजीनगर गावठाण, बाणेर, बालेवाडी, पाषाण, रस्ता पेठेचा काही भाग, सोमवार पेठेचा काही भाग, कोंढव्यातील टिळेकरनगर परिसर, येरवडा, बिबवेवाडीचा काही भाग, हडपसर यासह इतर भागात २० एअर वॉल्व्ह बसविण्यात आले आहेत. त्यातून हवा बाहेर पडून पाणी पुरवठा सुरळीत होईल. तसेच जलवाहिनीच्या शेवटी असलेल्या भागात (टेल एंड) पाणी पोहचत नाही. त्या नागरिकांच्या गुरुवारसह पुढील दोन ते तीन दिवस पाणी टंचाईला सामोरे जावे लागते.
पाणी बचत करण्यासाठी दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी उद्यापासून (ता. १८) करत आहोत. शुक्रवारी पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये यासाठी २० एअर वॉल्व्ह बसविण्यात आले आहेत. तसेच टँकरची व्यवस्था केली जाणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे.
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणी पुरवठा विभाग