
बा. शं. उपाध्ये जन्मशताब्दीनिमित्त स्वरयज्ञ
पुणे ः उपाध्ये व्हायोलिन विद्यालयाचे संस्थापक गुरुवर्य बा. शं. उपाध्ये यांच्या जन्मशताब्दीनिमित्त व्हायोलिन अकादमीतर्फे ‘स्वरयज्ञ’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी आठ वाजता ते रात्री आठ वाजेपर्यंत अशा सलग १२ तास चाललेल्या स्वरयज्ञात उपाध्ये व्हायोलिन वादन विद्यालयाच्या सर्व व्हायोलिन वादक कलाकारांनी सहभागी होऊन विविध राग प्रस्तुत केले. मैफिलीची सुरुवात अकादमीचे संस्थापक सदस्य शिरीष उपाध्ये व त्यांच्या शिष्यांनी राग तोडीने केली. त्यानंतर आर्या चांदेकर, माधवी गोखले, हर्ष एकबोटे, अमान वरखेडकर, चेतना जितुरी, चिन्मय काणे आदींनी विविध राग सादर केले. पं. अतुलकुमार उपाध्ये यांच्या काफी तराणाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कलाकारांना ताराशीश बक्षी व अनुराग अलूरकर यांनी तबल्याची साथसंगत केली.
‘किवियो’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे ः प्रवासवर्णन लिहिताना पाहिलेली ठिकाणे, तेथील सुविधा याबाबतचे अनुभव जरूर लिहावेत. परंतु त्यापेक्षा प्रवासात पाहिलेला निसर्ग, गावे, माणसे आणि समाजाबद्दल लिहायला हवे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी व्यक्त केले. विजय लोणकर लिखित ‘किवियो ः सफर न्यूझीलंडची’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ संपादक अरविंद गोखले, प्रा. संतोष भूमकर, प्रवीण बर्दापूरकर, जयदेव डोळे, मच्छिंद्र सोनवणे, जीवन कुलकर्णी आदी उपस्थित होते. ‘लोणकर यांच्या शैलीमुळे प्रवासवर्णन वाचनीय झाले आहे’, असे गोखले यांनी सांगितले. शाहु पाटोळे यांनी स्वागत केले.
संत मुक्ताबाई पुण्यतिथीनिमित्त निरूपण
पुणे ः संत मुक्ताबाई पुण्यतिथीनिमित्त निरूपणकार डॉ. प्रा. मुक्ता गरसोळे-कुलकर्णी यांनी संत मुक्ताबाई यांच्या प्रेरक चरित्राचे कथन अभंग गायनासह केले. ‘संत मुक्ताबाई या लहान वयात महान कार्य करणाऱ्या ज्ञानयोगिनी होत्या. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानकाका या भावंडांची त्या आदिमाया, गुरू, मार्गदर्शक झाल्या’, असे त्यांनी निरूपणात सांगितले. संतवाङ्मय प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुरेश गरसोळे यावेळी उपस्थित होते.