रक्तदाब रोखण्यासाठी त्रिसूत्री!

रक्तदाब रोखण्यासाठी त्रिसूत्री!

एका सर्वेक्षणानुसार शहरात राहणाऱ्या एकूण लोकसंख्येच्या ३३ टक्के लोकांमध्ये हा आजार दिसून येतो तर लहान गावात राहणाऱ्या २५ टक्के लोकांना हा आजार झाला आहे. तसेच भारतात होणाऱ्या एकूण मृत्यूपैकी जवळपास एक तृतीयांश मृत्यू हे रक्तदाबामुळे होतात असे आकडेवारी सांगते. यावरून या आजाराची व्याप्ती किती मोठी आहे, त्याची तीव्रता लक्षात येते.
- डॉ. अनंत एदलाबादकर

उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात मग ती व्यक्ती शहरात राहाणारी असो वा गाव-खेड्यात. त्यातल्या त्यात शहरी रुग्णांची संख्या जरा जास्त आहे. त्यामुळे सकस-समतोल आहार, व्यायाम, योगा, मेडिटेशन आणि औषधोपचार ही रक्तदाब नियंत्रित ठेवण्याची त्रिसूत्री आहे. याचे काटेकोरपणे पालन करा व आपले आयुष्य आनंदात जगा.


रक्तदाब म्हणजे काय?
धमनीमधून वाहत असलेल्या रक्ताचा धमनीच्या बाजूंवर पडणारा दाब म्हणजे रक्तदाब. ज्याप्रमाणे, वरच्या मजल्यावर नळाचे पाणी पोचण्यासाठी नळातून वाहणाऱ्या पाण्याला कमीतकमी फोर्स अथवा प्रेशर हवे असते त्याचप्रमाणे आपल्या शरीरात रक्ताभिसरण होण्यासाठी कमीतकमी असा विशिष्ट रक्तदाब हवा असतो. यालाच आपण नॉर्मल रक्तदाब असे म्हणतो. काही कारणास्तव हा रक्तदाब कमी अधिक होऊ शकतो आणि तसे झाल्यास रक्ताभिसरणात बिघाड होऊ शकतो.
नॉर्मल पेक्षा कमी रक्तदाब झाला असेल तर त्याला आपण कमी रक्तदाब (Hypotension) असे म्हणतो. जास्त प्रमाणात उलट्या, जुलाब झाल्याने वा इतर काही कारणास्तव शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास त्या व्यक्तीचा रक्तदाब कमी होऊ शकतो. तसेच नॉर्मलपेक्षा रक्तदाब जास्त असेल तर त्या स्थितीला आपण उच्च रक्तदाब (Hypertension) असे संबोधतो.

उच्च रक्तदाबाची कारणे
उच्च रक्तदाबाच्या ९५ टक्के रुग्णांमध्ये याचे नक्की कारण कळत नाही. वयोमानानुसार हृदय आणि रक्तवाहिन्यांमध्ये होणाऱ्या बदलामुळे प्रौढांमध्ये उच्च रक्तदाब जास्त प्रमाणात आढळतो. आई-वडीलांपैकी कुणाला हा आजार असेल तर त्यांच्या मुलाला हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. आजचे बदलते जीवनमान, सातत्याने एकमेकांशी सुरू असलेली चढाओढ, मानसिक तणाव, अपुरी विश्रांती, नियमित व्यायामाचा अभाव, कमी झालेली शारीरिक हालचाल यामुळे या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. लठ्ठपणा मुळे उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढले आहे. लठ्ठपणामुळेच मधुमेहाला आमंत्रण दिल्या जाते. मद्यपान, धूम्रपान करणाऱ्यांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त असते.

या आजाराची लक्षणे
या आजाराची सुरवात तरुणपणी अथवा मध्यम वयात सुद्धा होऊ शकते. रक्तदाब नॉर्मल पेक्षा वाढला किंवा कमी झाला तर पुढील लक्षणे दिसतात. सुरवातीला डोकं दुखणे, डोकं जड अथवा हलके हलके वाटणे, चिडचिड होणे, चक्कर येणे
अशा प्रकारचा त्रास होतो. जास्त प्रमाणात रक्तदाब वाढला असल्यास वरील लक्षणे जास्त तीव्रतेने जाणवतात तसेच या लक्षणांसोबत चक्कर येणे, तोल जाणे, कधी कधी रुग्ण बेशुद्ध होणे, अस्वस्थता वाढणे, छातीत धड धड होणे, थकवा जाणवणे, नाकावाटे रक्तस्राव होणे, रक्ताची उलटी होणे ही काही लक्षणे आहेत.

काय काळजी घ्यावी?
- सकस-समतोल आहार घ्यावा.
- आहारातील मिठाचे प्रमाण कमी करावे.
- खारट पदार्थ उदा. पापड, लोणचे, सरबत घेऊ नये.
- चरबी युक्त पदार्थ/तेलकट तूपकट खाऊ नयेत.
- वजन कमी करावे. वजन वाढणार नाही याची दक्षता घ्यावी.
- रोज नियमित व्यायाम, योग व मेडिटेशन करावे.
- चिंता मुक्त राहावे, तसा प्रयत्न करावा.
- पुरेशी शांत झोप शरीराला आवश्यक असते. ती घ्यावी.


- मद्य सेवन करू नये.
- धूम्रपान करू नये.
- ज्यांचा रक्तदाब वाढलेला आहे त्यांनी वरील गोष्टी सोबत डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा.

वर दिलेली पथ्य, बंधन नीट अमलात आणली आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित औषधोपचार घेतल्यास रक्तदाब नियंत्रित राहील. डॉक्टर सांगतील तेव्हाच त्यांच्या सल्ल्यानुसार औषध बंद करावे. स्वतःहून बंद करू नये. अधून-मधून रक्तदाब मोजावा, त्याची नोंद ठेवावी. कमी जास्त आढळल्यास ताबडतोब आपल्या डॉक्टरांना भेटावे. रक्तदाब मात्र नियंत्रणात न ठेवल्यास त्याचे गंभीर परिणाम शरीरातील इतर अवयवांवर जसे की हृदय, रक्त वाहिन्या, डोळे, किडनी, मेंदू इत्यादी वर होण्याची शक्यता असते. शरीरातील कुठलाही भाग, अवयव निकामी होण्याचा धोका असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com