महाविद्यालयांना ‘इंटर्नशिप’चा गृहपाठ गरजेचा
आपल्या परिसरातील उद्योग, सहकार, बॅंकिंग क्षेत्रांसोबत सहकार्य आवश्यक

महाविद्यालयांना ‘इंटर्नशिप’चा गृहपाठ गरजेचा आपल्या परिसरातील उद्योग, सहकार, बॅंकिंग क्षेत्रांसोबत सहकार्य आवश्यक

पुणे, ता. १७ : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिकाधिक कार्यानुभव उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयांनी उन्हाळी सुटीतच इंटर्नशिपचा गृहपाठ करणे गरजेचे असून, आपल्या परिसरातील उद्योग, सहकार, बॅंकिंग आदी क्षेत्रांसोबत परस्पर सहकार्य वाढविणे गरजेचे आहे.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून राज्यभरातील कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा होत आहे. त्यातील ४० टक्के श्रेयांक ऐच्छिक असून, शेवटच्या वर्षाला कार्यानुभव आणि संशोधनावर सर्वाधिक भर असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गरजेनुसार इंटर्नशिप उपलब्ध करून देणे आणि प्रत्यक्ष उद्योग अथवा व्यवसायांतील तज्ज्ञांची जुळवाजुळव करणे महाविद्यालयांसाठी अत्यावश्यक बनले आहे. आजवर कागदावर असलेले उद्योग आणि शैक्षणिक संस्थांचे परस्पर सहकार्य प्रत्यक्षात अस्तित्वात आणावे लागणार आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधीच महाविद्यालयांनी अशा संस्थांचा शोध घेत गृहपाठ पूर्ण करायला हवा.

तीन धड्यांचा गृहपाठ...
१) सहकारी शोधा
परिसरातील सामाजिक, सहकारी आणि बॅंकिंग क्षेत्रातील संस्थांबरोबरच सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा शोध घ्यायला हवा. यामधील गरजेच्या कौशल्यांचा शोध घेणे आणि त्यासाठी रचना उपलब्ध करायला हवी. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमानुसार अशा संस्थांशी सामंजस्य करार करावेत.

२) समाजाची गरज ओळखा
स्थानिक पातळीवरील समस्यांचे निराकरण करण्यासाठी कार्यानुभवाचा उपयोग होता का? याचा शोध घ्यायला हवा. उदा. सांडपाण्यामुळे नदी प्रदूषित होत असल्यास कार्यानुभवाच्या माध्यमातून प्रत्यक्ष कार्यवाही अहवाल तयार करता येईल. शेतकरी, स्थानिक व्यावसायिक आणि उद्योगांसाठी आवश्यक संशोधनाचे विषय निश्चित करता येतील.

३) भारतीय ज्ञान परंपरा
कला, साहित्य, संस्कृती आणि परंपरेतील वैज्ञानिक तथ्यांच्या अभ्यासासाठी आवश्यक रचना उभी करणे. स्थानिक परंपरांतील संशोधनाच्या संधी निश्चित करणे, त्यासाठी तज्ज्ञांचा शोध घेणे. एनईपीसाठी राज्य सुकाणू समितीने निश्चित केलेल्या संशोधन संस्थांसोबत परस्पर सहकार्य करार करणे.

आवश्यक पूर्वतयारी...
- विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापकांमध्ये नव्या धोरणाविषयी जागृती करणे
- नवीन शैक्षणिक धोरणानुसार अपेक्षित अभ्यासक्रमाची चाचपणी करणे
- नवीन शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक तयार करणे
- प्रयोगशाळा, ग्रंथालये आदींचे अत्याधुनिकीकरण करणे, त्यात गुंतवणूक वाढविणे
- कौशल्याधारित अभ्यासक्रमांसाठी तज्ज्ञांचा शोध घेणे

नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक कार्यानुभवाच्या संधी शोधायला हव्यात. प्रत्येक क्षेत्रातून नवीन काही मिळाले पाहिजे, याचा शोध घ्यायला हवा. समाज आणि उद्योगान्मुख शिक्षणासाठी आता महाविद्यालयांनी आवश्यक पूर्वतयारी करायला हवी.
- डॉ. नितीन करमळकर, अध्यक्ष, राज्य सुकाणू समिती, एनईपी

चार वर्षांच्या पदवीसाठी अभ्यासक्रमाबरोबरच उद्योगांचे एक नेटवर्क तयार करणे गरजेचे आहे. महाविद्यालयाच्या व्यवस्थापनानेही प्रत्यक्ष उद्योगांतील तज्ज्ञांशी संवाद साधून आवश्यक बदल करायला हवेत. खरंतर यासाठी आवश्यक निधीची तरतूदही गरजेची आहे.
- डॉ. एन. एस. उमराणी, माजी प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे
विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com