‘आयटीयन्स’मध्ये नोकरकपातीची धास्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आयटीयन्स’मध्ये नोकरकपातीची धास्ती
‘आयटीयन्स’मध्ये नोकरकपातीची धास्ती

‘आयटीयन्स’मध्ये नोकरकपातीची धास्ती

sakal_logo
By

पुणे, ता. १८ : आर्थिक अस्थिरतेचे सावट दूर होत असल्याचे चित्र असले तरी जगातील बड्या कंपन्या आणि आयटी क्षेत्रात अनेकांना रोजगार पुरविणाऱ्या नामांकित कंपन्यांतील नोकर कपात अद्यापही सुरूच आहे. प्रकल्पाची स्थिती स्थिर असतानाही अशा बड्या कंपन्या कामगारांची संख्या कमी करीत असतील तर आपल्या कंपनीवरदेखील त्याचा परिमाण होऊन आपल्याला रोजगार गमवावा लागतो की काय, अशी धास्ती सध्या अनेक ‘आयटीयन्स’मध्ये आहे.
खासकरून बड्या कंपनीने मुख्यालय सोडून इतर देशात कार्यरत असलेल्या ‘आयटीयन्स’मध्ये ही भीती सर्वाधिक आहे. गेल्या काही दिवसांत गुगल, मेटा, ॲमेझॉन आणि मायक्रोसॉफ्ट अशा बड्या कंपन्यांमधून अनेक नोकरदारांची कपात करण्यात आली आहे. त्यासह देशातील अनेक आयटी कंपन्यांनीदेखील त्यांच्या अनेक कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. त्यामुळे आयटीत आणि अशा बड्या कंपनीत कार्यरत असलेल्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
याबाबत नेसेन्ट इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी एम्प्लाइज सिनेटचे अध्यक्ष हरप्रीत सलुजा यांनी सांगितले की, कोरोना, रशिया-युक्रेन युद्ध, आर्थिक मंदीची परिस्थिती या सर्वांचा व्यवसायावर विपरीत परिणाम झाल्याचे कारण पुढे करत सध्या अनेक कंपन्यांनी त्यांचे कर्मचारी कमी करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अस्थिरचे वातावरण होते. गेले काही दिवस या परिस्थितीत सुधार झाला होता. मात्र आता पुन्हा नोकर कपात आणि तिचे परिणाम सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘‘आर्थिक तोट्याच्या नावाखाली कर्मचारी संख्या कमी करत असताना वरिष्ठांना मात्र चांगली पगारवाढ देण्यात येत आहे. त्यामुळे कनिष्ठ कर्मचारी नोकरी गमावत असताना वरिष्ठ पगारवाढीचा आनंद घेत असल्याची स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे तोटा झालेला नसताना कंपनीची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे कारण देऊन नोकर कपात करणाऱ्या कंपन्यांवर कायदेशीर कारवार्इ करावी, मागणी आयटीमधील कामगार संघटना करत आहेत.’’

देशातील एका बड्या आयटी कंपनीत मी गेल्या चार वर्षांपासून कार्यरत आहे. सिनिअर असलेल्या माझ्यासारख्या अनेक ‘आयटीयन्स’ला लक्ष्य करून काढण्यात येत असल्याचे प्रकार मी पाहिले आहेत. सध्या ‘आयटी’मधील नोकर भरतीची स्थिती स्थिर आहे. मात्र बड्या कंपनीत मोठ्या पदावर काम करणे मोठे आव्हान ठरत आहे. त्यामुळेच अनेक जण आता स्टार्टअपला पसंती देत आहेत.
- अंकुश, आयटीयन