
जागतिक स्पर्धेत शाल्मली उपविजेती
पुणे ः पुण्यातील विद्यार्थिनी शाल्मली कडू हिने ‘द इंडस आंत्रप्रेन्युअर्स’ (टीआयईच्या) या संस्थेनी आयोजित केलेल्या स्पर्धेत जागतिक स्तरावर दुसरा क्रमांक पटकावला आहे. नुकतेच टीआयई पुणेतर्फे आयोजित ‘बिझकोशंट’ स्पर्धेत कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी व ‘इनरजाईज’ची संस्थापिका शाल्मली विजेती ठरली होती. त्या आधारावर ती टीआयईच्या जागतिक स्तरावरच्या स्पर्धेसाठी उत्तीर्ण झाली. विविध देशातील ३४ शाखांमधील १४०० गटांनी या जागतिक स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत ‘हुबली’ या गटाने प्रथम क्रमांक पटकावला तर, दुसरा क्रमांक इनरजाईज पुणे या गटाने. तसेच तिसरा क्रमांक स्टेडीस्पून डलास या गटाला प्राप्त झाले. या स्पर्धेमध्ये शाश्र्वत उपाययोजना, महिला उद्योजक, सामाजिक प्रभाव अशा वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या स्पर्धकांची विजेते म्हणून निवड करण्यात आली. तर शाल्मलीने महिलांमधील पहिले क्रमांकाचे स्थान मिळवले.