कात्रज बोगदा ते नवले पूल @ ४० | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कात्रज बोगदा ते नवले पूल @ ४०
कात्रज बोगदा ते नवले पूल @ ४०

कात्रज बोगदा ते नवले पूल @ ४०

sakal_logo
By

पुणे, ता. १८ : मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कात्रज बोगदा ते नवले पूलदरम्यान जड, अवजड वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांसाठी आता प्रतितास ४० किलोमीटरची वेगमर्यादा निश्चित केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवार (ता. १९) पासून होणार आहे. या महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी वाहतूक पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. यात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) प्रकल्प संचालक, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी या सदस्यांचा समावेश होता. या समितीने कात्रज बोगदा ते नवले पूल परिसरात पाहणी करून अभ्यासपूर्ण अहवाल सादर केला. त्यात अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.
या समितीच्या बैठकीत वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्याच्या मूळ गंभीर मुद्यावर चर्चा करण्यात आली. त्यानुसार कात्रज बोगदा ते नवले पूल परिसरात जड, अवजड वाहनांसाठी वेगमर्यादा प्रतितास ४० किलोमीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात ट्रॅक्टर-ट्रेलर कॉम्बिनेशन, ट्रक-ट्रेलर, मल्टिएक्सल वाहने, कंटेनर, मालवाहतूक करणाऱ्या मोठ्या वाहनांचा समावेश आहे. या निर्णयाची १९ मे ते २५ मे या कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या संदर्भात नागरिकांनी काही सूचना असल्यास पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, येरवडा, पुणे यांच्या कार्यालयात २६ मे रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत लेखी स्वरूपात कळवाव्यात, असे आवाहन पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

अहवालातील निष्कर्ष
- नवीन कात्रज बोगदा ते नवले पुलादरम्यान झालेले अपघात हे जड-अवजड वाहनांमुळे
- अवजड वाहने घाटातून वेगात येताना त्यांची ब्रेकिंग सिस्टीम योग्य प्रतिसाद देत नाही
- चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे अपघात