सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोचवा भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोचवा
भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला
सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोचवा भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला

सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोचवा भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला

sakal_logo
By

पुणे, ता. १८ : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने भारताला जगात एक ताकदवान देश म्हणून समोर आणले आहे. देशात महामार्ग, रेल्वेचे जाळे तयार झाल्याने विकासाची घोडदौड सुरू आहे. सरकारने केलेली कामे, योजना नागरिकांना सांगा, त्यांच्याशी संवाद साधा. विरोधकांच्या टीकेने खचून, त्यांच्या मागे फरपटत जाऊ नका. आपला राजकीय अजेंडा आपणच सेट करायचा असतो,’’ असा सल्ला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला.

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यसमितीची बैठक बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आली होती. तिच्या समारोपप्रसंगी नड्डा बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, पंकजा मुंडे, तरुण चुघ, राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, सुनील देवधर, राज्याचे वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन आदी या वेळी उपस्थित होते.

नड्डा म्हणाले, ‘‘काँग्रेसचा आणि अभ्यासाचा आता काही संबंध उरलेला नाही. ते काहीही बोलत आहेत, त्यामुळे त्यांच्या नादाला लागू नका. गेल्या चार पिढ्या आपला पक्ष अंधारात होता, कष्टाने देशात सर्वत्र सत्ता आली आहे. पक्ष मोठा होत असताना पक्षाचा वाईटकाळ विसरून चालणार नाही. २०१४ नंतर जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा बदललेली आहे. ब्रिटनला मागे टाकून जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आपण झालेलो आहोत. विकसित देशांपेक्षा भारतातील महागाईचा दर कमी आहे आणि विकासदर जास्त आहे. रेल्वे, मेट्रो, विमानतळ बांधून पायाभूत सुविधांचा विकास मोदी सरकारने केलेला आहे. लोकांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. कार्यकर्त्यांनी लोकांशी संवाद साधून त्यांना सरकारच्या योजनांसंदर्भात माहिती द्यावी, घरोघरी जाणारा कार्यकर्ता हा शांतपणे बोलणारा आणि लोकांचे ऐकून घेऊन त्यांना शांतपणे उत्तर देणारा असला पाहिजे. तो उद्धटपणे वर्तन करणारा असू नये असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला.

स्वतःच्या ताकदीवर निवडून यायचे
आगामी काळातल्या सर्व निवडणुका आपण जिंकणार आहोतच. पण विरोधकांच्या कमकुवतपणापेक्षा आपण आपली ताकद वाढवून त्या ताकदीच्या बळावर आपल्याला निवडून यायचे आहे. जर आयुष्यभर पक्षाचे काम करताना आपण पाच कार्यकर्ते पक्षाशी जोडू शकलो नाही, तर कसे चालेल. येत्या वर्षभरात प्रत्येक कार्यकर्त्याने सर्व जाती-धर्मांतील दहा नवे कार्यकर्ते पक्षाशी जोडावेत, असे आवाहन नड्डा यांनी या वेळी केले.

नड्डा म्हणाले...
- महाविकास आघाडी म्हणजे महाराष्ट्राचा विकास रोखणारी आघाडी आणि भाजप-शिवसेना युती म्हणजे विकास करणारी आघाडी हे लोकांना सांगा
- तीस वर्षे ‘गरिबी हटाव’चे राजकारण करून गरिबी वाढवणारे आता आम्ही काय केले हा प्रश्न विचारत आहेत.
- महाविकास आघाडीचा एक मंत्री जेलमध्ये आहे, एक जेलमधून बाहेर आला आहे. अशा लोकांशी आपण कशासाठी चर्चा करायची?
- काँग्रेस सोबत गेलो, तर शिवसेना पक्ष बंद करेन असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते हे लोकांना सांगा.
- सावरकरांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अपमान.