राष्ट्रवादीमुळे निवडणुका रखडल्या
चंद्रशेखर बावनकुळे : विविध विषयांवर पुण्यात स्पष्ट केली भूमिका

राष्ट्रवादीमुळे निवडणुका रखडल्या चंद्रशेखर बावनकुळे : विविध विषयांवर पुण्यात स्पष्ट केली भूमिका

पुणे, ता. १८ : ‘‘महापालिका निवडणुका घेण्यास भाजप-शिवसेना आजही तयार आहे,’’ असे सांगून ‘‘महाविकास आघाडी सरकारने प्रभागरचनेसंदर्भात घेतलेला चुकीचा निर्णय आम्ही रद्द केला. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस न्यायालयात गेली आहे. म्हणून निवडणुकांना उशीर होत आहे,’’ अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापालिका निवडणुकांच्या विलंबाचे खापर राष्ट्रवादी काँग्रेसवर गुरुवारी फोडले.

भाजपच्या प्रदेश कार्यसमितीची बैठकीसाठी बावनकुळे पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी भाजप कार्यसमितीच्या बैठकीतील विषयांपासून ते महाविकास आघाडी सरकारचा गैरकारभार, कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील पराभव, आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांपासून ते उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रदीप कुरुलकर यांची अटक, त्र्यंबकेश्वर येथील वाद यांच्यासह विविध विषयांवर पक्षाची सविस्तर भूमिका मांडली.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मुंबई दौऱ्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता, ते म्हणाले, ‘‘किंचित सेनेतील नेतेमंडळी सोडून जातील या भीतीनेच मुंबईत भाजपचे कोणी नेते आले की राऊत टीका करतात.’’ मुंबईत महापौर आमचाच होणार, असेही या वेळी त्यांनी सांगितले. आगामी महापालिका निवडणुकांबाबत ते म्हणाले, ‘‘जोपर्यंत नवीन जनगणना होत नाही, तोपर्यंत सदस्य संख्या आणि प्रभागरचना वाढवता येत नाही. परंतु महाविकास आघाडी सरकारने नियमबाह्य काम करीत लोकसंख्या वाढवून प्रभागरचना तयार केली. त्यांच्या नेत्यांनीही ते मान्य केले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने ती रद्द केले. ती रद्द केली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस न्यायालयात गेली. त्यामुळे निवडणुकांना विलंब होत आहे. आम्ही आजही निवडणुका घेण्यास तयार आहोत. जेव्हा केव्हा निवडणुका होतील, तेव्हा संजय राऊत यांना नड्डा यांचा प्रवास किती महत्त्वाचा होता हे कळेलच.’’

कुरुलकर यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असणाऱ्या संबंधांबाबत ते म्हणाले, ‘‘पक्षाने त्यावर भूमिका का मांडावी? त्यांची चौकशी सरकारमार्फत केली जात आहे. कोणत्याही एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला, तर त्याचा संस्थेला अथवा संघटनेला दोष देता येणार नाही. ज्या व्यक्तीने गुन्हा केला असेल, त्यावर कारवाई झालीच पाहिजे, ही पक्षाची भूमिका आहे. तो कोणत्या जातीचा अथवा धर्माचा आहे, हे बघून भाजप कोणालाही टार्गेट करत नाही.’’ तथापि, कुरुलकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे का, या प्रश्नाला उत्तर देण्याचे त्यांनी सोईस्करपणे टाळले. तर पुणे लोकसभा निवडणुकीसंदर्भात निर्णय झालेला नाही, त्यामुळे आता त्यावर बोलण्यात काही अर्थ नाही, असे सांगून त्यांनी प्रश्नाला बगल दिली.

महागाईच्या ठरावावर थेट भाष्य नाही
कार्यसमितीच्या बैठकीत केंद्र सरकारने महागाई, बेरोजगारी, सिलिंडरमध्ये झालेली दरवाढ कमी करावी, या संदर्भातील ठराव मांडणार का, असा प्रश्‍न विचारला असता बावनकुळे म्हणाले, ‘‘हा प्रश्‍न आंतरराष्ट्रीय बाजाराशी निगडित आहे. कर्नाटकच्या निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसने अशी अनेक आश्वासने दिली आहेत. मात्र, त्यासाठीचे आवश्यक बजेट तरी त्यांच्याकडे आहे का,’’ असे सांगत थेट उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. तर राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असावा असा ठराव मांडणार का, या प्रश्नावरही त्यांनी भाष्य करणे टाळले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com