तीन लाख नागरिकांचा वीजपुरवठा खंडित

तीन लाख नागरिकांचा वीजपुरवठा खंडित

पुणे, ता. १८ : पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (पीजीसीआयएल) शिक्रापूर ते तळेगावच्या चारपैकी दोन अतिउच्चदाब वीजवाहिन्यांमध्ये गुरुवारी अचानक तांत्रिक बिघाड झाला. परिणामी चाकण एमआयडीसीसह पुणे शहरातील नगर रस्ता विभाग आणि पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी व भोसरी विभागातील सुमारे ३ लाख ५५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला. रात्री उशिरापर्यंत या सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरू होईल, असे महापारेषणकडून सांगण्यात आले.
‘पीजीसीआयएल’च्या शिक्रापूर ते तळेगाव अतिउच्चदाब ४०० केव्ही वीजवाहिन्यांच्या चारपैकी दोन वाहिन्यांमध्ये आज रात्री ७.१० वाजता तांत्रिक बिघाड झाल्यामुळे महापारेषण कंपनीच्या ४०० केव्ही चाकण, २२० केव्ही चिंचवड, २२० केव्ही उर्से, २२० केव्ही चाकण, १३२ केव्ही चाकण, १३२ केव्ही खराडी या अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद झाला. यात सुमारे ३९६ मेगावॉट विजेचा पुरवठा बंद झाल्यामुळे पुणे शहरातील प्रामुख्याने खराडी, वडगाव शेरी, विमाननगर, येरवडा, धानोरी आदी परिसरातील सुमारे १ लाख २५ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. सोबतच पिंपरी गाव, चिंचवड रेल्वेस्थानक परिसर, मोहननगर, पुनावळे, वाल्हेकरवाडी, वाकड, ताथवडे, किवळे, रावेत, थेरगाव परिसर, आणि संपूर्ण प्राधीकरणासह आकुर्डीमधील ५० टक्के परिसरातील २ लाख ३० हजार असे एकूण ३ लाख ५५ हजारांवर ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. यासोबतच चाकण एमआयडीसीमधील उच्च व लघुदाहबाच्या सुमारे ५ हजार औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला. तर १३२ केव्ही अतिउच्चदाब चाकण उपकेंद्रातून एका वीजवाहिनीद्वारे चाकण शहराचा वीजपुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे.
या पॉवर ग्रीडच्या अतिउच्चदाब ४०० केव्ही वीजवाहिन्यांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या अदानी कंपनीकडून बिघाड दुरुस्त करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. रात्री १०.३० च्या सुमारास महापारेषणच्या सर्व अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा सुरु होण्याची शक्यता आहे. त्यानंतर महावितरणच्या उपकेंद्रांचा टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरु करण्यात येईल. त्यामुळे सद्यस्थितीत खंडित असलेला सर्व भागातील वीजपुरवठा रात्री १०.३० ते ११.३० वाजेदरम्यान सुरळीत होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com