
Pune Fraud : मोठ्या टेंडरचे आमिष दाखवून पुणेकरांना घातला ५६ कोटींचा गंडा
पुणे - ‘महागडी गाडी, चकचकीत सूट, हातात ब्रेसलेट, चेहऱ्यावर श्रीमंतीची झळाळी... त्यात बड्या राजकीय नेत्यांच्या ओळखी... असे रुबाबदार व्यक्तिमत्त्व पाहून समोरील व्यक्ती क्षणभर थबकणारच. मोठे टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवून लाखोंच्या रकमा उकळायच्या. पोलिसांत तक्रार केल्यानंतर सेटलमेंट, तर काहींना धनादेश देवून खेळवत बसायचे... असा उद्योग पुण्यात काही ठकसेनांनी सुरू केला आहे.
काही प्रतिष्ठीत लोक समाजात अब्रू चव्हाट्यावर येईल, या भीतीपोटी समोर येत नाहीत’, बिबवेवाडी येथील लाखो रुपयांची फसवणूक झालेले मंगेश एकबोटे ‘सकाळ’शी बोलत होते. दरम्यान, सायबर गुन्हेगारही दररोज वेगवेगळी शक्कल लढवून लोकांना लाखो रुपयांना ‘ऑनलाइन’ लुबाडत आहेत. ठकसेनांनी केवळ पुण्यात गेल्या साडेचार महिन्यांत १७८ नागरिकांना ५६ कोटींहून अधिक रुपयांचा गंडा घातला आहे.
घटना क्रमांक १ : प्रभात रस्ता येथील एक व्यक्ती आणि त्यांच्या भागीदाराने मालमत्ता खरेदी केली होती. त्यावर बॅंकेचा कर्जाचा बोजा असल्यामुळे त्यांनी ज्या व्यक्तीकडून मालमत्ता खरेदी केली त्यांना बिनव्याजी सुरक्षाठेव म्हणून तीन कोटी रुपये दिले. परंतु आरोपीने बॅंकेचा बोजा कमी केला नाही. उलट विश्वासाने दिलेली बिनव्याजी तीन कोटींची अनामत रक्कमही परत केली नाही. याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी कैलास गर्ग आणि पवन गर्ग या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
घटना क्रमांक २ : जमिनीवरील बेकायदेशीर ताबा काढून सातबारावर नोंद करून देतो, असे सांगून पाचजणांनी वानवडी येथील चंद्रकांत पटेल नावाच्या व्यक्तीकडून एक कोटी ६३ हजार रुपये घेतले. परंतु त्यांचे कोणतेही काम केले नाही. शेवटी पटेल यांनी त्यांच्याकडे पैसे परत मागितले. त्यावेळी आरोपीने कमरेचे पिस्तूल काढून तक्रार मागे न घेतल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी आनंद शेजवळ याच्यासह पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
घटना क्रमांक ३ : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एकाने ‘वेरा’ ब्रोकर ॲप सुरू केले. त्यात गुंतवणुकीवर दररोज पाच टक्के नफा मिळेल, असे आमिष दाखवून कोंढव्यातील उस्मान कारभारी आणि कुटुंबीयांकडून सव्वातीन लाख रुपये ऑनलाइन घेतले. परंतु नंतर नफा तर दूरच मुद्दलही परत केले नाही. याबाबत कोरेगाव पार्क पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
घटना क्रमांक ४ : टार्गेट-जी नावाच्या डिजिटल मार्केटिंग कंपनीने मार्केट यार्डमधील आकाश नावाच्या २५ वर्षीय तरुणाला ऑनलाइन रिव्ह्यूचा जॉब देतो, असे सांगितले. त्यानुसार केलेल्या कामाचा मोबदला मागितला असता संकेतस्थळावरून काही बीटकॉइन खरेदी करण्यास सांगितले. त्यासाठी तरुणाने दोन लाख ५५ हजार रुपये ऑनलाइन भरले. मात्र त्यानंतर कामाचा मोबदलाही नाही आणि जवळचे पैसेही गेले. याबाबत मार्केट यार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुणे शहरातील दाखल फसवणुकीचे गुन्हे (१ जानेवारी ते १८ मे २०२३)
परिमंडळ दाखल गुन्हे उघड अटक आरोपी फसवणुकीची रक्कम
परिमंडळ १ ३४ १६ ०८ १२ कोटी ८८ लाख रुपये
परिमंडळ २ २४ १५ १० २० कोटी एक लाख रुपये
परिमंडळ ३ ३४ २३ ११ ४ कोटी ९६ लाख रुपये
परिमंडळ ४ १९ १५ १० २ कोटी ३९ लाख रुपये
परिमंडळ ५ ६७ ४३ ३४ १६ कोटी २४ लाख रुपये
एकूण १७८ ११२ ६३ सुमारे ५६ कोटी ४९ लाख रुपये.
नागरिकांनी गुंतवणुकीवर जादा व्याजाच्या आमिषाला बळी पडू नये. सध्या विजेचे थकीत बिल भरण्यासाठी एमएसइबीच्या नावाने बनावट लिंक पाठवून फसवणूक करण्याचा ट्रेंड सुरू आहे. काहींना क्रेडिट कार्ड किंवा ऑनलाइन खरेदीचे आमिष दाखवून लिंक पाठवली जाते. त्या अनोळखी लिंकवर क्लिक करून पैसे भरू नयेत. बॅंक खात्याची माहिती इतरांना देवू नये. शक्यतो बॅंकेचा आणि दैनंदिन वापराचा मोबाईल क्रमांक वेगवेगळा असावा.
- श्रीनिवास घाडगे, पोलिस उपायुक्त- आर्थिक व सायबर गुन्हे शाखा पुणे