
फक्त आणि फक्त अपेक्षाभंग!
पुणे, ता. १९ ः गावे महापालिकेत गेली, त्यामुळे आम्हाला चांगले रस्ते, पाणी, वीज मिळेल अशी अपेक्षा होती, प्रत्यक्षात आजही रस्त्यांवरील खड्डे आणि धुळ लोकांच्या माथी आहे. पाण्यासाठीची वणवण आजही थांबलेली नाही. साधे ड्रेनेजही नाही. अधिकारी केवळ येतात, जातात. कामे कुठलेही होत नाहीत, अशा प्रतिक्रिया समाविष्ट गावांमधील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
पुणे महापालिकेत २३ गावे समाविष्ट होऊन दोन वर्ष होत आली, तरी अद्यापही त्यांना साध्या सोई-सुविधाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याची सद्यःस्थिती ‘सकाळ’ने ‘समाविष्ट २३ गावे आगीतून फुफाट्यात’ या वृत्ताद्वारे प्रकाश टाकला होता. त्याबाबत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया पाठवून प्रशासनाकडून होत असलेल्या विलंबाचा फटका सर्वसामान्यांना कशा पद्धतीने बसत आहे, याबाबतच्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे...
वाघोली येथील फुलमळा रस्ता परिसरात बांधकाम व्यावसायिकांना परवानगी रोड असल्याचे दाखवून रस्त्याचा वापर केला जात आहे. पावसाळ्यात या रस्त्याची दुरवस्था होते. पावसाळ्यातच नाही, तर १२ महिने रस्त्यावरून ये-जा करताना, विशेषतः लहान मुलांना शाळेत नेताना अक्षरशः जीव मुठीत घेऊन जावे लागते. तरीही ड्रेनेज नाही, रस्ते नाहीत. पीएमआरडीएचे अधिकारी, स्थानिक आमदार येऊन जातात, प्रश्न मात्र कधीच सुटत नाही.
- स्थानिक रहिवासी
नांदेड ते खडकवासला पर्यंतच्या रस्त्याचे काम २५ वर्षांपासून सुरु आहे. खडकवासला गावातील दलित वस्ती ते धरणापर्यंतचा रस्त्याचे काम तीन महिन्यांपासून सुरु असूनही ते पूर्ण होत नाही. लिंबाच्या तालमीजवळ असलेल्या स्वच्छतागृहामुळे ज्येष्ठ नागरिक, भाजी मंडईत येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. शौचालयांची दुरवस्था आहे. स्मशानभूमीमध्ये भरतीसाठी तासभर थांबावे लागते, तेथेही दुर्गंधीचा त्रास आहे. डीआयएटीजवळ वाहतूक कोंडी होऊनही त्याकडे लक्ष दिले जात नाही.
- शंकर मते
गावे महापालिकेत गेली म्हणून आम्ही गावात राहायला आलो. दोन वर्ष झाली, पाण्याची समस्या असूनही कोणी हा प्रश्न सोडवित नाही. दिवसाआड पाणी मिळत असून २००-३०० लोकांच्या सोसायट्यांना गंभीर समस्येला जामोरे जावे लागत आहे.
- महेश साळुंके, कात्रज
आपलं घर या गृहनिर्माण सोसायटीच्या इथे जाण्यासाठी रस्ता मंजूर असल्याचे सरकारकडे नोंद आहे. प्रत्यक्षात सध्या उपलब्ध रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात रस्ता पूर्ण खराब असतो. मुलांना शाळेत ने-आण करणे अवघड होऊन बसले आहे. पथदिव्यांचा अभाव आहे. ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया, विद्यार्थी, लहान मुले यांच्या अडचणी लक्षात घेऊन ५०० मीटर रस्ता दुरुस्त करण्यात यावा.
- अ. वि. पाटील, किरकट वाडी
ग्रामपंचायतीने वर्क ऑर्डर दिलेही कामेही महापालिकेने केलेली नाहीत. कचऱ्याची समस्या गंभीर आहे. कचरा प्रकल्पाची फाइल मंत्रालयातच पडून आहे. रस्त्यांवर दिवे नाहीत. अधिकारी वर्ग इकडे फिरकत नाही, सर्वसामान्य नागरिकांच्या किरकोळ अडचणी असतात. त्याही महापालिकेकडून सोडविल्या जात नाहीत. त्यामुळे पालिकेत जाऊन काही उपयोग होत नसल्याची सद्यःस्थिती आहे.
- वसुंधरा उबाळे, माजी सरपंच, वाघोली
कचरा, ड्रेनेजची समस्या महापालिकेत गेल्यानंतरही कायम आहे. पिण्यासाठी जलवाहिन्या नाहीत. रस्ते खराब आहेत. कचरा नियमितपणे उचलला जात नाही, त्यामुळे महिलावर्गाचे हाल होत आहेत. सोई कुठल्याही नाहीत, मात्र कर घेण्याचे काम मात्र थांबत नाही.
- नितीश लगड, माजी सरपंच, नांदेड
-----------