
विद्यार्थ्यांवर अजूनही ‘कोरोना इफेक्ट’
पुणे, ता. २० ः कोरोना काळातील ऑनलाइन शिक्षणाच्या ‘मोड’मधून अजूनही विद्यार्थी बाहेर आलेले नाहीत. त्यामुळे वर्गातील अनुपस्थितीपासून परीक्षेतील अनुत्तीर्णतेपर्यंत अनेक समस्यांना महाविद्यालये सध्या तोंड देत आहेत. ऑनलाइन शिक्षणामुळे एका जागेवर वर्गात बसून एकाग्रतेने शिक्षण घेण्यात खंड पडला. मात्र त्याचे विपरीत परिणाम आता महाविद्यालयांमध्ये दिसून येत आहेत. विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती प्रचंड प्रमाणात घटली असून, निकाल खालावला आहे. त्यामुळे इयत्ता बारावीनंतर पुढे शिक्षणच नको, अशी काहीशी मानसिकता अनेक विद्यार्थ्यांनी स्वीकारली असल्याचे महाविद्यालयांचे प्राचार्य सांगत आहेत.
महाविद्यालयांमध्ये आता लेखी स्वरूपात परीक्षा होत असून, प्रथम वर्षात दीर्घोत्तरी प्रश्न लिहिणे अनेक विद्यार्थ्यांना अवघड गेले आहे. त्यामुळे सुमारे ४० ते ४५ टक्के विद्यार्थी नापास झाल्याचे प्राचार्य सांगतात. खडकी येथील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे सांगतात, ‘‘कोरोनातील ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमधील लिहिण्याची सवय कमी झाली आहे. नियमितच्या तासांना विद्यार्थी थांबत नसून, पहिल्याच सत्रात सुमारे ४५ टक्के विद्यार्थी नापास झाले आहेत. परिणामी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी परीक्षा अर्ज भरण्यासाठी पुढे येत नाहीत. शिक्षकांनी परीक्षा अर्ज भरण्यासाठी संपर्क साधला असता फोन उचलत नाहीत. उचललेला फोन तर शिक्षकांशी संवाद न साधताच बंद करतात. परीक्षा अर्ज भरण्यासाठी उत्सुक नसल्याचे दाखवतात. कोरोनानंतर विद्यार्थ्यांच्या वागण्या-बोलण्यात बदल झाला आहे. ही बाब गंभीर असून त्याकडे वेळीच लक्ष द्यावे लागणार आहे.’’
नक्की घडतंय काय?
- वर्गात एकाग्रचित्ताने तासिका ऐकण्याकडे विद्यार्थ्यांचा कल कमी
- अभ्यासापासून परीक्षेपर्यंत विविध पळवाटा शोधण्याकडे कल
- बहुपर्यायी प्रश्नांच्या सवयीमुळे दीर्घोत्तरी प्रश्नांकडे दुर्लक्ष
- प्रात्यक्षिकांचा पुरेसा अभ्यास नाही
- परीक्षेत विषय मागे राहण्यापासून ते अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढले
- कोलमडलेल्या शैक्षणिक वेळापत्रकामुळे विद्यार्थी जुळवून घेण्यास अपुरा वेळ
- मोबाइलचा अनावश्यक वापर वाढला
महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेऊन नोकरी करण्याऐवजी इयत्ता बारावीच्या पात्रतेवरच पोलिस भरतीची तयारी करण्याचा किंवा अग्नीवर होण्याकडे विद्यार्थ्यांचा कल दिसून येत आहे. सेमिस्टर पॅटर्न, क्रेडिट सिस्टीम आदींमुळे परीक्षांची संख्या वाढली आहे. त्यातच वर्गात बसलो नाही म्हणून आपले काही बिघडत नाही, अशी विद्यार्थ्यांची मानसिकता तयार झाली आहे. परंतु त्याचा परिणाम निकालावर दिसत असल्याने द्वितीय सत्राच्या परीक्षेचा अर्ज भरण्यास विद्यार्थी उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे.
- डॉ. के. सी. मोहिते, प्राचार्य, सी. टी. बोरा महाविद्यालय, शिरूर