‘मोबाईल व्हॅन’ ठेवणार प्रदूषणावर देखरेख

‘मोबाईल व्हॅन’ ठेवणार प्रदूषणावर देखरेख

पुणे, ता. १९ : पुण्यातील हवेच्या गुणवत्तेवर आता अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज ‘मोबाईल व्हॅन’ देखरेख करणार आहे. राज्यासाठी पंधरा व्हॅनची खरेदी करण्यात आली असून, त्यापैकी एक पुण्यात तैनात करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे (एमपीसीबी) देण्यात आली.
शहरातील हवेच्या गुणवत्तेवर देखरेख करण्यासाठी सद्यःस्थितीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने चार ठिकाणी उपकरणे बसविली आहेत. त्यापैकी कर्वे रस्ता, स्वारगेट, भोसरी आणि पिंपरी चिंचवड येथे ही उपकरणे आहेत. या माध्यमातून त्या भागातील हवेच्या प्रदूषणाची अद्ययावत माहिती नियमित संकलित केली जाते. मात्र, त्याव्यतिरिक्त औद्योगिक क्षेत्र, कचरा व्यवस्थापन होणारा भाग येथील हवेची गुणवत्ता मोजणारी यंत्रणा उपलब्ध नव्हती. मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून ही सुविधा आता मंडळाकडे आली आहे, अशी माहिती ‘एमपीसीबी’च्या अधिकाऱ्यांनी दिली.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकार शंकर वाघमारे म्हणाले, ‘‘राज्यातील वेगवेगळ्या भागातील हवेच्या गुणवत्तेवर देखरेख करण्यासाठी ही मोबाईल व्हॅन खरेदी करण्यात आली आहे. त्यापैकी एक व्हॅन पुण्यात देण्यात आली आहे. शहर आणि परिसरातील हवेची गुणवत्ता मापन करण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या ठिकाणी ही व्हॅन उभी केली जात आहे. आतापर्यंत चाकण, उरुळी देवाची या ठिकाणी व्हॅनच्या माध्यमातून हवेची गुणवत्ता तपासण्यात आली आहे. त्याचा सविस्तर अहवाल लवकरच मिळेल.’’
मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रताप जगताप म्हणाले, ‘‘हवेतील सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म धूलिकण, वाहनांमधून आणि औद्योगिक कारखान्यांमधून होणारे उत्सर्जित होणारे प्रदूषक यांची माहिती यातून मिळेल.’’

पहिला प्रयोग
मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून हवेची गुणवत्ता सातत्याने नोंदण्याचा हा राज्यातील पहिला प्रयोग आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात काही तास ही व्हॅन उभी केली जाणार आहे. त्या परिसरातील हवेच्या गुणवत्तेची अद्ययावत माहिती यातून संकलित केली जाईल.

पुण्याच्या दृष्टीने महत्त्व
पुण्यात हवेची गुणवत्ता ‘बरी’ या गटामध्ये येते. वाहनांचा धूर हे शहरातील हवा प्रदूषित होण्याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे शहरातील प्रदूषण नियंत्रणाचे ध्येयधोरण ठरविताना या व्हॅनची माहिती उपयुक्त ठरेल.

कशी आहे व्हॅन?
मोबाइल व्हॅनमध्ये हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी वेगवेगळे सेंसर्स लावण्यात आले आहेत. त्या माध्यमातून हवेत कोणत्या घटकाचे किती प्रमाण आहे, याची माहिती लगेच उपलब्ध होते. विजेवर आधारित ही सर्व यंत्रणा व्हॅनमध्ये बसविण्यात आली आहे.

व्हॅनमधून कोणती माहिती मिळणार?
हवामानाबद्दल...
- वाऱ्याचा वेग आणि दिशा
- तापमान आणि हवेतील आद्रता
- अतिनील किरणांची माहिती

हवेच्या गुणवत्तेबद्दल
- सूक्ष्म धूलिकण (पीएम १०)
- अतिसूक्ष्म धूलिकण (पीएम २.५)
- अतिनील किरणे

हवेतील प्रदूषकांबद्दल
- सल्फर डायऑक्साइड
- नायट्रोजन ऑक्साइड
- कार्बन मोनॉक्साइड
- कार्बन डायऑक्साइड
PNE23T44064

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com