
दगडूशेठ गणपती देवस्थान आता ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ
पुणे, ता. १९ : श्रीमंत दगडूशेठ गणपती देवस्थानला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यास शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्याबरोबरच संपूर्ण जिल्ह्यात राज्य शासनाची ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्याचा, चिंचवड येथील मोरया गोसावी देवस्थान परिसराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. खासदार शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘पुणे शहरात नव्याने समाविष्ट झालेली गावे लक्षात घेता तेथील सुविधांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत देण्यात येणाऱ्या निधीत वाढ करण्यात येणार आहे. शहर आणि ग्रामीण पोलिस दलाला वाहनांसाठी आवश्यक निधी देण्याचा आणि पोलिसांनी अद्ययावत साहित्याची मागणी केल्यास अधिकचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.’’
राज्यातील गड व किल्ले, मंदिरे व महत्त्वाची संरक्षित स्मारके आदींचे संवर्धन करण्याच्या योजनेअंतर्गत ४१ कोटी ९३ लाख रुपये प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने सिंहगड, राजगड, तोरणा, चाकण, पुरंदर किल्ला, रायरेश्वर मंदिर, वाफगाव येथील होळकर वाडा या ऐतिहासिक वास्तूंचा समावेश करण्यात आला आहे.
- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री