अकरावी प्रवेश नोंदणीत आधार क्रमांकाची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकरावी प्रवेश नोंदणीत 
आधार क्रमांकाची मागणी
अकरावी प्रवेश नोंदणीत आधार क्रमांकाची मागणी

अकरावी प्रवेश नोंदणीत आधार क्रमांकाची मागणी

sakal_logo
By

पुणे, ता. १९ : आधार क्रमांक नसलेल्या विद्यार्थ्यांची गणना संचमान्यतेसाठी न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचे पडसाद अर्थातच शिक्षकांच्या सेवेवर उमटले. म्हणूनच आता इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश नोंदणीत विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नमूद करण्यात यावा, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे करण्यात आली आहे.
राज्यातील इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी नुकतेच जाहीर केले. या संभाव्य वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना येत्या २५ मेपासून ऑनलाइन प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी विद्यार्थ्यांकडून अकरावी प्रवेशाचा पहिला भाग भरून घेतला जातो. दहावीच्या निकालानंतर प्रवेश अर्जाचा भाग दोन म्हणजेच महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते.
राज्य सरकारने २००९-१० पासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू केली. तसेच शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने केले जातात.

आधार क्रमांक नसलेल्या विद्यार्थ्यांची गणना संचमान्यतेसाठी न करण्याचा निर्णय सरकारने यावर्षी अचानक घेतला आहे. त्यामुळे तांत्रिक उणिवांमुळे, आधार नोंदीतील विसंगतीमुळे शिक्षण घेत असलेल्या सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांना सरकारने अमान्य करीत शिक्षकांची संख्या सुमारे पंधरा ते वीस हजारांनी कमी केली आहे. इयत्ता अकरावीमध्ये ऑनलाइन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा आधार कार्ड विसंगतीमुळे शासन अमान्य करीत आहे. त्यामुळे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक नमूद करण्यात यावा.
- प्रा. मुकुंद आंधळकर, समन्वयक, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ