
पन्नास लाखांची खंडणी मागणाऱ्या चौघांना अटक
पुणे, ता. २० : कंपनीतील तीन कामगारांनी साथीदारांच्या मदतीने मालकाला धमकावून ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चारजणांना अटक केली आहे.
सौरभ संजय बनसोडे (वय २१, रा. रामनगर, वारजे), पवन मधुकर कांबळे (वय २२, रा. धायरी), संकेत योगेश जाधव (वय २४, रा. नऱ्हे) आणि कृष्णा भीमराव भाबट (वय १९, रा. धायरी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज महामार्गावरील आर्यन स्कूलजवळ पाच-सहा जणांनी सहा मे रोजी कंपनीच्या मालकाची मोटार अडवून शिवीगाळ आणि मारहाण केली. तसेच, १२ मे रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांना मोबाईलवर व्हॉटसअप कॉल करून ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास फिर्यादी आणि कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून चार जणांना अटक केली. परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक यांच्या पथकाने ही कारवाई केली.