नोटबंदी पण, सराफांची चांदी

नोटबंदी पण, सराफांची चांदी

पुणे, ता. २० : भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी सराफ बाजारातील उलाढाली काहीशा वाढल्या आहेत. दोन हजार रुपयांच्या नोटा वापरून सोन्या-चांदीची खरेदी होत आहे. गुंतवणूक करून भविष्यात फायदा व्हावा आणि आपल्याकडील दोन हजार रुपयांच्या नोटा संपाव्यात, या उद्देशाने ही खरेदी होत आहे.

दोन हजार रुपयांची नोट वापरून व्यवहार करीत असताना ग्राहकांकडून घोषणापत्र (डिक्लेरेशन) घेतले जात आहे. त्यात ग्राहकाचे नाव, आधार, पॅन कार्ड क्रमांक नमूद केला जात आहे. तर काही सराफांनी या नोटा २३ मेनंतरच घोषणापत्रासह स्वीकारणार असल्याचे स्पष्ट केले. यंदाचा लग्नसरार्इचा कालावधी संपत आल्याने सराफ बाजार थोडा थंडावला होता. मात्र, दोन हजार रुपयांच्या नोटाबंदीमुळे येथील उलाढाली वाढतील. शनिवारी (ता. २०) व्यवहारात मोठी तेजी नव्हती. मात्र, खरेदी वाढली आहे. गेल्या वेळी नोटाबंदी केल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली होती, तसा गोंधळ या वेळी निर्माण होर्इल, असे वाटत नाही. खरेदीबाबत चौकशी वाढली आहे, अशी माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.

अधिकचे पैसे घेऊन विक्री?
नोटा बदलून घेण्यासाठी अनेकांची मागील नोटबंदी वेळी दमछाक झाली होती. अशीच परिस्थिती पुन्हा निर्माण होवू नये, म्हणून काही ग्राहक दोन हजार रुपयांच्या जादा नोटा देवून खरेदी करीत असल्याचीही स्थिती आहे. प्रति दहा ग्रॅमसाठी बाजार भावापेक्षा पाच ते आठ हजार रुपये जादा देवून दोन हजार रुपयांच्या नोटा वापरून खरेदी होत आहे.

दागिन्यांची खरेदी केल्यानंतर दोन लाखांपर्यंतच रोख रक्कम स्वीकारता येते. व्यवहारात काहीशी वाढ आहे. मात्र, मोठा परिणाम जाणवलेला नाही. कधीही नोटबंदी होत असल्याने चलनावरील विश्‍वासाहर्यता कमी झाली आहे.
- फत्तेचंद रांका, व्यवस्थापकीय संचालक, रांका ज्वेलर्स

जे ग्राहक खरेदीसाठी येत आहे, ते मोठ्या प्रमाणात दोन हजारच्या नोटा वापरत असल्याचे निदर्शनास आलेले नाही. घोषणापत्र घेऊन आम्ही या नोटा स्वीकारत आहोत. नोटा बदलण्यासाठी वेळ असल्याने जास्त गोंधळ होर्इल, असे वाटत नाही.
- विपुल अष्टेकर, संचालक, कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स

दोन हजारच्या नोटांचा वापर करून दागिन्यांची खरेदी करताना घोषणापत्र द्यावे लागत आहे. त्यात ग्राहकांचा आधार आणि पॅन क्रमांक असेल. त्यामुळे कोणी किती व कशाप्रकारे खरेदी केली याची माहिती समजू शकणार आहे. सध्या सराफ बाजार स्थिर आहे.
- अमित मोडक, कमोडिटीतज्ज्ञ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पीएनजी ॲण्ड सन्स

दागिने मोडण्यासाठी आलेले ग्राहक दोन हजार रुपयांची नोट स्वीकारत नसल्याचे चित्र शनिवारी पाहायला मिळाले. आता बुकिंग केले व नंतर दोन हजार रुपयांच्या नोटांद्वारे खरेदी केली तर चालेल का? दोन हजार रुपयांच्या किती नोटा स्वीकारता, अशा प्रकारची चौकशी होत आहे.
- प्रतीक संभूस, भागीरथी ज्वेलर्स

काही दिवसांपूर्वीच मी सोन्याचे दागिने बुक केले होते. त्याची डिलिव्हरी घेण्यासाठी आज पेढीमध्ये आलो होतो. खरेदीसाठी मी माझ्याकडे असलेल्या काही दोन हजार रुपयांच्या नोटा देखील वापरल्या. दोन हजार रुपयांच्या नोटा देवून खरेदी करताना कुठेही अडवणूक झाल्याचा अनुभव आला नाही.
- उराजेश साकोरे, ग्राहक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com