
संगणक अभियंत्याला दहा लाखांचा गंडा
पुणे, ता. २० : घरातून ऑनलाइन कामाची संधी उपलब्ध करून देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी संगणक अभियंत्याला नऊ लाख ७५ हजार रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
संगणक अभियंता असलेल्या तरुणाने याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुण नोकरीच्या शोधात आहे. सायबर चोरट्यांनी त्याला एक मेसेज पाठवून घरातून ऑनलाइन कामाची संधी आहे. सोशल मीडियावरील जाहिराती आणि व्हीडिओंना लाइक मिळवून दिल्यास पैसे मिळतील, असे आमिष दाखविले. सुरुवातीला चोरट्यांनी तरुणाला परतावा दिला. त्यानंतर ऑनलाइन टास्कमध्ये आणखी काही रक्कम गुंतवल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. त्यासाठी तरुणाने चोरट्यांनी सांगितलेल्या बँक खात्यात वेळोवेळी एकूण नऊ लाख ७५ हजार रुपये जमा केले. पैसे जमा झाल्यानंतर चोरट्यांनी त्याला परतावा दिला नाही. चोरट्यांचा मोबाईल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले.