
बांधकाम क्षेत्रात अंतर्गत व्यवहारांना तेजी
पुणे, ता. २० ः रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांची नोट बंद केल्याने त्याचा फ्लॅट बुकिंगवर परिणाम होणार नाही. मात्र, बांधकाम व्यवसायातील रोखीच्या व्यवहारांना गती येणार आहे. ठेकेदार, मजूर, बांधकाम साहित्य यासह इतरांना जे देणे आहे यात तेजी येईल. जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार रोखीने करण्यास प्राधान्य दिले जाईल, असे काही बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले.
केंद्र सरकारने २०१६ मध्ये ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटांच्या व्यवहारावर अचानक बंदी घातली, तेव्हा बँकांबाहेर रांगा लागल्या होत्या. रिझर्व्ह बँकेने दोन हजारच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर या निर्णयामुळे २०१६ च्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. बांधकाम व्यावसायात ठराविक रक्कम रोख देऊन बहुतांश रक्कम ही कर्जाद्वारे उपलब्ध करून दिली जाते. शिवाय अनेक खरेदीदारांचा ऑनलाइन व्यवहारांवरच भर असतो. त्यामुळे दोन हजाराची नोट चलनातून बाहेर जाणार असल्याने फ्लॅटच्या खरेदीविक्रीवर फार परिणाम होणार नाही.
असा फिरणार पैसा
सप्टेंबर अखेरपर्यंत दोन हजाराच्या नोट बदलून घेण्यास मुदत असल्याने विविध ठेकेदारांना, डिलरला दोन हजार रुपयांच्या नोटांच्या माध्यमातून पैसे दिले जातील. ठेकेदारांच्या मजुरांना बँकेत पाठवून दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून आणण्यास सांगितले जाईल. २०१६ मध्येही अशी युक्ती वापरत मजुरांना बँकेच्या रांगेत थांबविले होते. मात्र, आता बाजारात नोटांचे कमी असलेले प्रमाण, पैसे बदलून घेण्यासाठी असलेली पुरेशी मुदत यामुळे फार गोंधळ होणार नाही, असे काही बांधकाम व्यावसायिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाहेर जाणार असल्याचे त्याचा फारसा परिणाम बांधकाम व्यवसायावर होणार नाही. सर्व व्यवहार पारदर्शी होत असल्याने रोखीचे प्रमाण खूप कमी असते.
- सतीश मगर, राष्ट्रीय अध्यक्ष, क्रेडाई
२०१६ च्या नोटबंदीनंतर रोखीमध्ये पैसे ठेवण्याचा नागरिकांचा कल नाही. घर खरेदी करणारे बहुतांश नागरिक हे कॉर्पोरेट क्षेत्राशी निगडित आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून ऑनलाइन व्यवहारावर भर आहे. त्यामुळे दोन हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्याने घरे विक्रीवर परिणाम होणार नाही.
- रवींद्र रांजेकर, बांधकाम व्यावसायिक
रिझर्व्ह बँकेने दोन हजाराच्या नोटा बदलण्यासाठी बराच वेळ दिला आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायावर फारसा परिणाम होणार नाही.
- अमोल रावेतकर, बांधकाम व्यावसायिक