भविष्य जैव अर्थव्यवस्थेचे ः चौधरी

भविष्य जैव अर्थव्यवस्थेचे ः चौधरी

पुणे, ता. २२ ः शाश्वत विकासासाठी १७ पैकी सात ध्येय हे जैव ऊर्जेतून साध्य होणार असून, भविष्य हे जैव अर्थव्यवस्थेचेच असेल, असा विश्वास प्राज उद्योगाचे संस्थापक डॉ. प्रमोद चौधरी यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील ‘एक आठवडा एक प्रयोगशाळा’ या उपक्रमाच्या उद्‍घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. होमी भाबा रस्त्यावरील एनसीएलच्या प्रयोगशाळेत आयोजित या कार्यक्रमाला ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, एनसीएलचे संचालक डॉ. आशिष लेले, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) माजी संचालक डॉ. शेखर मांडे, भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचे (आयसर) संचालक डॉ. सुनील भागवत, खासदार रणजित नाईक-निंबाळकर आदी उपस्थित होते. ‘सीएसआयआर’च्या वतीने देशभरातील प्रयोगशाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत असून, याद्वारे विद्यार्थी, नागरिक, उद्योजक आणि शास्त्रज्ञांपर्यंत असा सर्व घटकांसाठी विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, २७ मेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. दररोज वेगवेगळ्या विषयावर चर्चासत्र, पॅनल डिस्कशन आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

‘एनसीएल’च्या भेटीसाठी...
या प्रदर्शनासाठी पूर्वनोंदणी न केलेल्यांना जागेवर थेट जाऊन नोंदणी करत प्रदर्शनाला भेट देता येईल. यासाठी सकाळी ११ ते दुपारी चार यावेळेत आपण एनसीएलला भेट देऊ शकता. आपल्यासोबत ओळखपत्र असणे गरजेचे आहे. ‘एनसीएल’मधील सात महत्त्वाच्या प्रयोगशाळांत चाललेले संशोधनाचे प्रदर्शन आपल्याला पाहता येईल. स्वच्छ ऊर्जा, हायड्रोजन फ्युएल सेल, शाश्वत रासायनिक उद्योग, पुनर्वापर, कृषी तंत्रज्ञान आदी क्षेत्रातील कटिंग एड्ज संशोधनाची माहिती मिळेल. तसेच विविध स्टार्टअप्सही आपल्याला पाहता येईल. नागरिकांनी येताना उन्हाळा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन ‘एनसीएल’च्या वतीने करण्यात आले आहे.

आपल्या देशासमोरील समस्यांच्या निराकरणासाठी शास्त्रज्ञांनी केलेल्या कामाची माहिती सर्वसामान्यांना व्हावी, म्हणून हा जनसंपर्काचा उपक्रम राबविण्यात आला आहे. हवामान बदलापासून ते साथीच्या आपत्तींना तोंड देण्यासाठी शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधांचे हे प्रदर्शन आहे.
- डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ

बऱ्याच वर्षानंतर एनसीएलमधील संशोधनाचे प्रदर्शन सर्वसामान्यांसह विद्यार्थी, उद्योग, प्रशासन आणि स्टार्टअप्ससाठी खुले केले आहे. आठवडाभरात हे सर्व ‘एनसीएल’ला भेट देणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील प्रदर्शनाचा आमचा पहिलाच प्रयत्न आहे. सात वेगवेगळ्या क्षेत्रात केलेल्या संशोधनाचे प्रदर्शन येथे मांडण्यात आले आहे.
- डॉ. आशिष लेले, संचालक, एनसीएल

फोटो ः 44471

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com