शाळा प्रवेशापासून विद्यार्थी वंचित

शाळा प्रवेशापासून विद्यार्थी वंचित

पुणे/औंध, ता. २२ : पुणे महापालिकेच्या बोपोडी, चिखलवाडी, औंध येथे प्राथमिक इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. परंतु या शाळांमधील विद्यार्थ्यांना परिसरात असणाऱ्या महापालिकेच्या माध्यमिक शाळेत प्रवेश मिळत नसल्याने पालक हवालदिल झाले आहेत.
या भागात विद्यार्थ्यांसाठी चिखलवाडीतील माता रमाबाई आंबेडकर शाळा असून येथे इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग चालू होते. हे वर्ग चालवण्याची जबाबदारी महानगरपालिकेने नेमलेल्या संबंधित संस्थेकडे दिली होती. परंतु आता हे वर्ग अचानकपणे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे बोपोडी, चिखलवाडी आणि औंध येथील प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत प्रवेश घेण्यास जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याची चित्र आहे. परिणामी पालकांना विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शाळा शोधण्याकरिता वणवण करावी लागत आहे.
‘‘यापुढे शाळा चालणार नाही, तुम्ही तुमचे दाखले काढून दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्या’’ असे शाळेतील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेतील शिक्षकांकडून सांगण्यात आले आहे. अचानक ओढवलेल्या या परिस्थितीमुळे ‘विद्यार्थ्यांनी कुठे प्रवेश घ्यावेत’ असा प्रश्न पालक विचारत आहेत. शाळांनी प्रवेश बंद केल्याने मुलांचे भवितव्य अंधातरी आहे. या विद्यार्थ्यांचे आत्तापर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले असून या परिसराच्या जवळपास महापालिकेची इंग्रजी माध्यमाची दुसरी माध्यमिक शाळा नसल्याने पालकांपुढे विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न उभा ठाकला आहे.

पुणे महापालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक हे शुल्क भरून अन्य खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेऊ शकणार नाहीत. अचानकपणे शाळा बंद करून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळायचा कुठलाही अधिकार प्रशासनाला नाही. त्यामुळे लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- अमित मुरकुटे, माजी सदस्य, महापालिका शिक्षण मंडळ

पुणे महापालिकेच्या माध्यमिक शाळा या काही संस्थांच्या माध्यमातून चालविण्यात येतात. परंतु महापालिकेसोबत काम करणाऱ्या काही संस्थांनी आपण काम करण्यास इच्छुक नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे याबाबत निर्णय होणे बाकी आहे. लवकरच त्याबाबत माहिती दिली जाईल.
- मीनाक्षी राऊत, शिक्षणाधिकारी, माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभाग, पुणे महानगरपालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com