
कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत प्री-व्ह्यू थिएटरचे उद्घाटन
पुणे, ता. २२ ः कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील स्कूल ऑफ मीडिया ॲक्टिव्हिटी, रिसर्च ॲण्ड टेक्नोलॉजी अर्थात ‘स्मार्ट’ या विभागातील ‘स्मार्ट टॉकीज’ या आधुनिक प्री-व्ह्यू थिएटरचे उद्घाटन नुकतेच झाले. ‘द केरला स्टोरीज’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले.
चित्रपटाचे निर्माते विपुल शाह, मुख्य अभिनेत्री अदा शर्मा, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देव, सचिव डॉ. पी. व्ही. एस. शास्त्री, विश्वस्त मिलिंद लेले, ‘स्मार्ट’च्या संचालिका राधिका इंगळे, विभागाचे समन्वयक देवदत्त भिंगारकर आदी याप्रसंगी उपस्थित होते. ‘स्मार्ट’तर्फे माध्यम क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थिनींसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेला ‘बी- व्होक मीडिया ॲण्ड एन्टरटेंन्मेट’ हा पदवी अभ्यासक्रम राबविला जातो. याअंतर्गत थिएटरची निर्मिती करण्यात आली असून प्री-व्ह्यू थिएटरमध्ये एकाचवेळी ३२ जण चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात. थिएटरमधील साउंड सिस्टिम, स्क्रिनसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याची माहिती या वेळी राधिका इंगळे यांनी दिली.