आपलं भविष्य
आपल्या हाती...

आपलं भविष्य आपल्या हाती...

रोज सकाळी लवकर उठून, घर स्वच्छ झाडावे. त्यामुळे घरात सुख आणि समृद्धी येते. छताला कोठे जळमटे असतील तर तीही काढून टाकावीत. त्यामुळे आपल्या मनातील जळमटेही आपोआप निघून जातात. त्यानंतर अंघोळ करून, देवपूजा करावी. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. यानंतर आलं घालून, मस्तपैकी चहा बनवून, बेडरूममध्ये जावे आणि बायकोला उठवून, तिला बेड टी द्यावा. त्यामुळे आयुष्य सुखी होते...अशा गोष्टींवर राहुलचा पहिल्यापासून विश्‍वास आहे. बेड टी दिल्यानंतर राहुल बायकोशी चर्चा करून, नाश्‍त्याचा मेनू ठरवतो. त्यानुसार मस्तपैकी नाश्‍ता तयार करून, पेपर वाचत बसलेल्या बायकोच्या पुढ्यात ठेवतो.
‘‘आज काय पेपरमध्ये विशेष?’’ उगाचंच तो प्रश्‍न विचारतो.
‘‘आपल्या घराजवळ मेला एकही साड्यांचा सेल लागला नाही.’’ किंवा ‘‘आजचं ‘राशी भविष्य’ माझ्या मनासारखं आलं नाही. कालचंच बरं होतं. आजचं समजून, कालचंच वाचते.’’ अशी निरर्थक वाक्ये त्याच्या कानावर पडली तरी न चिडता, ‘भाजी कोणती करू?’ असा प्रश्‍न तो विचारतो. त्यामुळे मनस्ताप त्याच्या वाट्याला येत नाही तसेच चिडचिडही कमी होते. बायकोच्या कपाळावर दिवसभर आठ्या दिसणार नाहीत, याची काळजी राहुल नेहमी घेत असतो. चुकून आठ्या दिसू लागल्या तर तिचं डोकं दुखू अगर न दुखू तो तिच्या कपाळाला बाम लावून, त्या आठ्या घालवतो.
‘‘तुमचं लक्ष कोठंय?’’ असा किरकोळ प्रश्‍न विचारून, बायकोचा भांडायचा मूड असला तर तो तिच्या फोनवरून, तिच्या आईला मिसकॉल देतो. त्यामुळे पुढील तासभर तरी घरात शांतता नांदते, असा त्याचा अनुभव आहे. तासाभरानंतर ‘मला खूप कामे आहेत, नंतर फोन करते’ असं बायको म्हणते, त्यावेळी तर राहुलचं हृदय भरून येते.
बायकोच्या आई-वडिलांविषयी त्याच्या मनात कितीही राग असला तरीही तो कधीही ओठांवर आणत नाही. ‘तुझे आई-वडील, जगात भारी आहेत. तुझ्या भावासारखा हुशार माणूस मी आजतागायत पाहिला नाही,’ अशी काही फोडणीची वाक्ये तो आठवड्यातून एकदा-दोनदा म्हणतो. त्यामुळे अळणी स्वयंपाकाचीच काय पण संसाराचीही गोडी वाढते. ‘माझ्या लेकीची सगळी घरकामे जावई करतो. फारच गुणाचा आहे. मात्र, आमचा मुलगा बायकोपुढचा नंदीबैल आहे. सगळं तिचं ऐकतो.’ अशी वाक्य सासरे बोलू लागले, की राहुलच्या अंगावर मूठभर मांस चढते.
अनेकदा त्याच्या हातातून चूक होते. अशावेळी बायको आपल्या धारेवर धरणार, याची त्याला खात्री पटते. अशावेळी न डगमगता ‘तू माझ्या आयुष्यात आलीस, आणि माझ्या आयुष्याचं सोनं झालं. तू नसतीस तर माझ्या हातून अनेक चुका होऊन, माझं आयुष्य भरकटलं असतं.’ असं म्हणून तिचा राग थोपवून धरतो.
‘घरात सुख -समृद्धी येऊ दे, वैताग आणि कटकटी बाहेर जाऊ दे’ अशी प्रार्थना तो बायकोकडे पाहून करतो आणि त्यानंतर रात्रभर शांतपणे झोपी जातो.

.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com