डॉ. कश्मिरा ‘युपीएससी’त राज्यात ‘टॉप’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. कश्मिरा ‘युपीएससी’त राज्यात ‘टॉप’
डॉ. कश्मिरा ‘युपीएससी’त राज्यात ‘टॉप’

डॉ. कश्मिरा ‘युपीएससी’त राज्यात ‘टॉप’

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : ‘‘लहानपणापासूनच आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन नागरी सेवा करायची हे मनात रुजले होते. दरम्यान, दंतवैद्यकीय शिक्षण घेऊन रुग्णसेवा केली. रुग्णसेवा करतानाच आपल्याला केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन मोठ्या पातळीवर आणि व्यापक स्वरूपात नागरी सेवा करायची आहे, हा निर्धार अधिक बळकट झाला. आता ही संधी मिळणार असल्याने आनंद गगनात मावेनासा झाला आहे,’’ अशा शब्दांत डॉ. कश्मिरा संखे यांनी भावना व्यक्त केल्या.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२२मध्ये डॉ. कश्मिरा या देशात गुणवत्ता यादीत २५व्या क्रमांकावर असून असून महाराष्ट्रातील ‘टॉपर’ आहेत. घरात वैद्यकीय सेवेची परंपरा असतानाही डॉ. कश्मिरा यांनी वैद्यकीय सेवेबरोबरच नागरी सेवा करण्याचा निर्धार केला आणि त्या २०१९पासून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करू लागल्या. त्यांचे शालेय शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मुंबईत झाले आहे. तर मुंबईतील शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालय (फोर्ट) येथून त्यांनी बीडीएस ही पदवी घेतली. खरंतर त्यांचे वडील खासगी तेल कंपनीत (वितरण विभाग) उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत, तर आई नॅचरोपॅथीतील डॉक्टर म्हणून सेवा देत आहे. मोठी बहीण देखील दंतवैद्यक आहे. तर लहान भाऊ सध्या अभियांत्रिकी शिक्षण घेत आहे. मात्र, तरीही शाळेत असल्यापासूनच डॉ. कश्मिरा यांना नागरी सेवा क्षेत्र खुणावत होते.
‘‘लहानपणापासून माजी सनदी अधिकारी किरण बेदी यांना वेगवेगळ्या माध्यमातून पाहत आले. माझी आई त्यांच्याबद्दल सातत्याने सांगायची. त्यांच्याबद्दल आदर आणि त्यांची यशोगाथा लहानपणीच मनात खोलवर रुजली होती. आपणही देशासाठी काही तरी करायला हवे, हे तेव्हाच मनाने ठरविले,’’असे सांगत डॉ. कश्मिरा यांनी आपला प्रवास उलगडला.
याआधी त्यांनी २०२० आणि २०२१मध्ये प्रयत्न केला होता. परंतु या दोन्ही प्रयत्नात पूर्व परीक्षा देखील त्या उत्तीर्ण होऊ शकल्या नाहीत. परंतु तिसऱ्या प्रयत्नात एकाच वेळी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत यात त्यांना यश मिळाले.

परीक्षेच्या तयारीसाठी मी खूप आधीपासूनच दररोज वर्तमानपत्र वाचत होते. ते मी कटाक्षाने पाळले. २०१८मध्ये बीडीएसची पदवी घेतली त्यानंतर २०१९मध्ये इंटर्नशिप केली आणि त्यानंतर नागरी सेवा परीक्षेचा अभ्यास खऱ्या अर्थाने सुरू केला. मला तिसऱ्या प्रयत्नात यश आले.
- डॉ. कश्मिरा संखे