बंद पडलेल्या प्रकल्पांना देणार नोटिसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बंद पडलेल्या प्रकल्पांना देणार नोटिसा
बंद पडलेल्या प्रकल्पांना देणार नोटिसा

बंद पडलेल्या प्रकल्पांना देणार नोटिसा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २३ : प्रकल्पास मान्यता मिळून पाच वर्षांहून अधिक कालावधी होऊनही ते पूर्ण न झालेले नाही, अशा सुमारे वीस प्रकल्पांच्या विकसकांना नोटिसा पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती एसआरए प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी मंगळवारी दिली. त्यानंतरही त्यांनी कोणीही कार्यवाही केली नाही, तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उभारण्यात येईल, असेही ते म्हणाले.
एसआरए प्राधिकरणाची परवानगी मिळून पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतरही ज्या प्रकल्पांचे कामे पूर्ण झाली नाहीत, अशा सुमारे ५१७ प्रकल्पांचे काम रद्द करण्याची घोषणा तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी होती. हे सर्व प्रकल्प मुंबई शहरातील आहेत. त्याच धर्तीवर पुणे शहरातील एसआरए प्रकल्पांबाबत गटणे यांना विचारले असता त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘पाच वर्षांहून अधिक कालावधी पूर्ण झाल्यानंतर ही ज्या प्रकल्पांचे काम पूर्ण झालेले नाही, अशा प्रकल्पांची माहिती घेण्यात येत आहे. असे सुमारे वीस ते बावीस प्रकल्प असण्याची शक्यता आहे. या प्रकल्पांच्या विकसकांना लवकरच नोटिसा बजाविण्यात येणार येणार आहे. त्यानंतरही त्यांनी प्रकल्प पूर्ण केले नाही, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

सुधारित नियमावली लवकर
शहर झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी प्राधिकरणाकडून सुधारित बांधकाम नियमावलीचा प्रस्ताव २०२१ मध्ये राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. लवकरच त्यास मान्यता मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करून गटणे म्हणाले, ‘‘झोपडीधारकांची होणारी ही गैरसोय लक्षात घेऊन प्राधिकरणाने पुनर्वसन प्रकल्पांसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या सुधारित नियमावलीत बांधकाम व्यावसायिकांना अनेक सवलती देतानाच प्रकल्प मुदतीत पूर्ण व्हावा, यासाठी झोपड्यांची संख्या विचारात घेऊन कालावधी निश्‍चित केला आहे. एवढेच नव्हे तर एक पाऊल टाकत जर प्रकल्प कालवधीत पूर्ण न केल्यास संबंधित व्यावसायिकाला दंड करण्याचे अथवा त्यांच्याकडून प्रकल्प काढून घेण्याचे अधिकार एसआरए प्राधिकरणाला देण्याची महत्त्वपूर्ण शिफारस नियमावलीत प्रस्तावित करण्यात आली आहे.

सर्व्हेक्षणाचे काम बंद
प्रकल्पांना होणारा विलंब लक्षात घेऊन हे काम गतीने व्हावे, यासाठी प्राधिकरणाने पुढाकर घेत निविदा काढून पात्र-अपात्र झोपडीधारकांची संख्या निश्‍चित करण्यासाठी, त्याचबरोबरच झोपडीधारकांना ओळखपत्र देण्यासाठी २०१८ मध्ये निविदा काढून एका संस्थेला काम देण्यात आले होते. मात्र या संस्थेने केलेल्या कामात अनेक गैरप्रकार झाले असल्याचे समोर आले. तसेच सर्व्हेक्षणातही अनेक चुका असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्या संस्थेकडून हे काम काढून घेण्यात आले असल्याचेही गटणे यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे सर्व्हेक्षणाचे हे काम देखील संध्या बंद पडले असल्याचे यावरून समोर आले आहे.

एसआरए प्रकल्पांची सद्यःस्थिती
- एकूण दाखल प्रस्ताव : ३०२
- दप्तरी दाखल प्रस्ताव : ४६
- नव्याने दाखल होणाऱ्या प्रस्ताव : ३१
- मंजूर केलेल्या योजना : २२५
- पात्रता यादी तयार करणे : ५३
- बांधकाम प्रगतीपथावरील योजना : ७३
- भोगवटा प्रमाणपत्रावरील योजना : २१
- भोगवटा प्रमाणपत्र जमा केलेल्या योजना : ६१
- कार्यवाही सुरू असलेले - १७