लग्न मुलाचं दुःख आईचं... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लग्न मुलाचं
दुःख आईचं...
लग्न मुलाचं दुःख आईचं...

लग्न मुलाचं दुःख आईचं...

sakal_logo
By

‘‘आई, माझ्या वर्गातील विराज आठवतोय का? त्याला काल मुलगी झाली. किती गोड मुलगी आहे म्हणून सांगू.?’’ संदीपने आईला स्मिताला आत्मीयतेने सांगितले.
‘‘माझ्यापेक्षा तीन वर्षांनी लहान असलेली आपल्या सोसायटीतील श्‍वेता काल मला मंदिरात भेटली. अगं तिला दोन मुले आहेत. थोरला मुलगा तिसरीत गेला आहे तर धाकटा बालवाडीत जातोय.’’ संदीपने आणखी माहिती पुरवली.
‘‘बरं झालं बाई! तिचा संसार मार्गी लागला. तिची सासू फार खाष्ट आहे, असं तिची आई सारखं मला सांगायची. सासूबाईंची कशी जिरवायची, अशा टीप्सही त्या सतत श्‍वेताला देत असत. बहुतेक त्यांच्या प्रयत्नांना यश आलं असावं.’’ स्मिताने म्हटलं.
‘‘आपल्या गावाकडचा मनोज मला काल भेटला होता. माझ्यापेक्षा पाच वर्षांनी तो लहान असल्याने मला ‘दादा, दादा’ म्हणत होता. त्याचं गेल्या महिन्यांतच लग्न झालं. लग्नाला का आला नाहीस, असं विचारत होता.’’ संदीपने सहजतेने म्हटले.
‘‘अरे मग तू जायचं होतंस ना? तुला कोणी अडवलं होतं.’’ स्मिताने म्हटले.
‘‘आई, लहानपणापासून मी तुला फार कष्ट करताना बघतोय. तुझे कष्ट कमी व्हावेत, तुला आराम मिळावा, अशी माझी फार इच्छा आहे. तुझ्या हाताखाली कोणीतरी असावं, असं मला नेहमी वाटतं.’’ संदीपने गुगली टाकली.
‘‘तुला माझी फारच काळजी वाटत असेल व मला आराम मिळावा, असं वाटत असेल तर सकाळी लवकर उठून, घरकामात मला मदत करत जा.’’ स्मिताने म्हटले. त्यावर संदीप नाराज झाला.
‘‘आई, आपल्या समोरच्या चौकात आनंद मंगल कार्यालय काय मस्त झालंय. तू एकदा बघायला पाहिजेल.’’ संदीप सहज बोलला. त्याचं हे बोलणं ऐकून, स्मिता चिडली.
‘‘काय रे तासाभरापासून काय लावलं आहेस, अमक्याचं लग्न झालं, तमक्याला मुलगी झाली. कोणाचा मुलगा तिसरीत आहे, चौकात मंगल कार्यालय झालंय, तुला काय म्हणायचंय, ते स्पष्ट सांग.’’ आईने रागाने म्हटले.
‘‘आई, माझ्या वर्गातीलच काय पण माझ्यापेक्षा पाच-सहा वर्षांनी लहान असलेल्या मुला- मुलींची लग्नं झाली आहेत. माझं वय लग्नाचं झालं आहे, हे तुझ्या लक्षात यावं म्हणून मी सगळी उदाहरणे दिली आहेत.’’ संदीपने म्हटले.
‘‘हे बघ, तुझं वय लग्नाचं झालं असलं, तरी माझं वय सासू होण्याचं अजिबात झालं नाही. अरे अजून मी तिशीतील दिसते. तुझं लग्न झालं, सूनबाई घरात आली तर माझ्या वयाचं बिंग फुटेल ना? तुझ्या लग्नानंतर दीड-दोन वर्षांनी तुला मूल-बाळ होईल. म्हणजे मी आजी होईल. त्यामुळं आजी होण्याचं तर माझं वय नक्कीच झालं नाही. ज्यावेळी मला वाटेल, माझं वय सासूबाई, आजी व्हायचं झालं आहे, त्यावेळी तुझ्या लग्नाचं बघू.’’ असे म्हणून स्मितानं डोळ्यांवर आलेली बट कानामागे घेतली.