
अनधिकृत हॉटेलवर कारवाई
पुणे, ता. २३ : भूगाव-भुकूम येथील तलावालगतच्या चार अनधिकृत हॉटेलवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) कारवाई करत बांधकाम ते जमीनदोस्त केले. यामध्ये वाणिज्य स्वरूपाची चार अनधिकृत बांधकामे पीएमआरडीएकडून पाडली. अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाकडून एकूण सुमारे १४ हजार ९६९चौरस फूट असलेले अनधिकृत बांधकाम दोन पोकलेनच्या साहाय्याने पाडले. या कारवाईवेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. यावेळी पीएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मानस चौपाटी या हॉटेलचे ४ हजार ४५३ चौरस फूट बांधकाम पाडले. थलासा हॉटेलचे ३ हजार ६४ चौरस फूट बांधकाम, थ्री स्टेज हॉटेलचे २ हजार ९४० चौरस फूट आणि ९० डिग्री हॉटेलचे ४ हजार ५१२ चौरस फूट असे एकूण १४ हजार ९६९ चौरस फूट बांधकाम पाडले. अनधिकृत बांधकामधारकांकडून अनधिकृत बांधकाम निष्कासनाचा खर्च वसूल केला जाईल, असे प्राधिकरणाकडून सांगितले. तसेच परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम करण्यात येऊ नये, असे आवाहन पीएमआरडीएकडून केले आहे.