
होर्डिंग दराबाबत न्यायालयाचा निर्णय पालिकेच्या पथ्थ्यावर
पुणे, ता. २३ ः महापालिकेच्या हद्दीमध्ये उभारलेल्या एका होर्डिंगच्या खटल्यामध्ये उच्च न्यायालयाने संबंधित होर्डिंगसाठी ५८० रुपये याप्रमाणे चौरसफूट दर आकारण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेऊन महापालिका होर्डिंगधारकांकडून ५८० रुपये याप्रमपाणे होर्डींगसाठी शुल्क घेण्यासाठी राज्य सरकारसमवेत पत्रव्यवहार करणार आहे. न्यायालायाच्या आदेशामुळे महापालिकेच्या आशा पल्लवित झाल्याची चिन्हे आहेत.
मागील महिन्यात पिंपरी-चिंचवडच्या हद्दीमध्ये होर्डिंग कोसळून काही नागरीकांना आपला जीव गमावला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिकेकडून अनधिकृत होर्डिंग्ज, फ्लेक्सविरुद्ध कडक कारवाई केली. दरम्यान, शहर आणि समाविष्ट गावांमध्ये मोठ्या प्रमाणात होर्डिंग उभारल्याचेही उघड झाले. महापालिका प्रशासनाने मागील काही वर्षात होर्डिंग परवाना शुल्कासाठीचा भाडेदर १११ रुपयांवरून दुप्पट म्हणजेच २२२ रुपये इतका केला होता. तर यावर्षी महापालिकेने शहराच्या जुन्या हद्दीमध्ये ५८० रुपये प्रति चौरसफूट इतका केला आहे. दरम्यान, होर्डिंग मालकांनी महापालिकेच्या २२२ रुपये दराबाबत न्यायालयात दाद मागितली होती. अनेक दिवस प्रलंबित असलेल्या या दाव्यामध्ये न्यायालयाने १११ रुपयांप्रमाणे तुर्तास भाडे घेऊन परवानगी देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, महापालिकेने १११ रुपये प्रमाणे परवाना नूतनीकरण केला. त्याचवेळी होर्डींगचे नवीन दरही जाहीर केले. त्याविरोधातही होर्डींगधारकांनी पुन्हा एकदा न्यायालयाचे दार ठोठावले होते.
दरम्यान, काही होर्डिंगधारकांनी हा प्रश्न थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे मांडला. शिंदे यांनी न्यायालयातील खटल्याचा अंतिम निकाल लागत नाही, तोपर्यंत होर्डिंगचे ५८० रुपयांऐवजी जुने १११ रुपये याप्रमाणे भाडे आकारणी करण्याचे आदेश महापालिकेस दिले होते. त्याचवेळी एका जाहिरात कंपनीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीवेळी संबंधित जाहिरात कंपनीला महापालिकेने आकारलेल्या दरानुसार भाडे आकारणीचे आदेश दिले आहेत. संबंधित प्रकरणामध्ये न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे महापालिकेस ५८० रुपये दराने शुल्क आकारता येऊ शकतो, या आदेशाचाच आधार घेऊन महापालिका ५८० रुपये दराने होर्डिंगसाठी भाडे आकारणीची परवानगी मिळावी, यासाठी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.