पुणे शहर,जिल्ह्यात आज लाक्षणिक हेल्मेट दिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे शहर,जिल्ह्यात आज लाक्षणिक हेल्मेट दिवस
पुणे शहर,जिल्ह्यात आज लाक्षणिक हेल्मेट दिवस

पुणे शहर,जिल्ह्यात आज लाक्षणिक हेल्मेट दिवस

sakal_logo
By

पुणे, ता. २३ ः पुणे शहर व जिल्ह्यात येत्या बुधवारी (ता.२४) हेल्मेट वापराच्या जनजागृतीसाठी लाक्षणिक हेल्मेट दिवस साजरा करण्यात येणार आहे. हेल्मेट वापराबाबत जनजागृती व्हावी, कर्मचाऱ्यांची हेल्मेट परिधान करण्याची ही कृती ही जनतेस मार्गदर्शक ठरावी आणि प्रत्येकामध्ये स्वतःबरोबरच सहप्रवाशाच्या सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने या लाक्षणिक हेल्मेट दिवसाचे आयोजन केले आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हा लाक्षणिक हेल्मेट दिवस’ साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

देशात रोज सुमारे ४११ नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. वाहन अपघातात मृत्यू होणाऱ्या व्यक्तींमध्ये सुमारे ८० टक्के व्यक्ती या दुचाकीचालक, पादचारी आणि सायकलस्वार असतात. हेल्मेटमुळे दुचाकीचा अपघात घडल्यास जीव वाचण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे मोटार वाहन कायद्यानुसार ४ वर्षांपुढील प्रत्येक व्यक्तीने दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट परिधान करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी म्हटले आहे.

जागतिक स्तरावर १५ ते २१ मे या कालावधीत शाश्वत वाहतूक या विषयावर ‘७ यूएन ग्लोबल रोड सेफ्टी वीक २०२३’ चे आयोजन केले होते. रस्ते अपघातांबाबत सामाजिक संस्था, सरकारी यंत्रणा, प्रसारमाध्यमे आणि सामान्य नागरिकांचे लक्ष वेधणे व रस्ते अपघात टाळण्याच्या प्रयत्नांना बळकटी देणे, हा या सप्ताहाचा हेतू होता. भारतात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दुचाकी चालविणाऱ्या आणि दुचाकीवर पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जनजागृतीसाठी सप्ताहांतर्गत गत हा हेल्मेट दिवस साजरा करण्यात येत आहे.

आज यांच्यासाठी हेल्मेटसक्ती

- दुचाकीचा वापर करणारे सर्व सरकारी अधिकारी, कर्मचारी.
- निमसरकारी कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचारी.
- महामंडळे, महापालिकांमधील कर्मचारी.
- नगरपालिका, शाळा, महाविद्यालयांमधील कर्मचारी.

हेल्मेट परिधान न केल्यामुळे रस्ते अपघातात नागरिकांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पुणे शहरात बुधवारी दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करण्याबाबत जनजागृती करणार आहे. त्यासाठी सरकारी कार्यालयांजवळ वाहतूक पोलिस कर्मचारी नेमणार आहेत.
- विजयकुमार मगर,
पोलिस उपायुक्त,
पुणे शहर वाहतूक शाखा.