परीक्षा अर्ज भरण्यासाठी शेवटची मुदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परीक्षा अर्ज भरण्यासाठी शेवटची मुदत
परीक्षा अर्ज भरण्यासाठी शेवटची मुदत

परीक्षा अर्ज भरण्यासाठी शेवटची मुदत

sakal_logo
By

पुणे, ता. २४ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची उन्हाळी सत्राचा परीक्षा अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना काही कारणास्तव अर्ज भरता आले नाहीत. अशा विद्यार्थ्यांना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. अखेर परीक्षा व मूल्यमापन मंडळाने गुरुवारी (ता. २५) एक दिवस ऑनलाइन अर्ज प्रक्रिया खुली करण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यापीठाने मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची शेवटची संधी उपलब्ध करून दिली असून, महाविद्यालयांनाही एक दिवस अर्ज इनवर्ड करण्याचा वेळ दिला आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यामधील विविध महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या सुमारे सव्वा सहा लाख विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज दरवर्षी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे प्राप्त होतात. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने येत्या ऑगस्ट महिन्यापूर्वी परीक्षा घेऊन विद्यापीठातर्फे निकाल जाहीर केले जाणार आहेत. त्यामुळे विद्यापीठाने मे महिन्यापर्यंतच परीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदत दिली. परंतु, दिलेल्या मुदतीमध्ये सुमारे दहा ते पंधरा हजार विद्यार्थी अर्ज भरू शकले नाहीत. या विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यास मदत वाढ द्यावी, अशी मागणी केली होती. विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने याबाबत पाठपुरावा केला.

आत्तापर्यंत सुमारे ५ लाख ९७ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले आहेत. काही कारणास्तव परीक्षा अर्ज भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना एक दिवस परीक्षा अर्ज भरण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली जात आहे. २४ मे रोजी रात्री १२ वाजल्यापासून २५ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा अर्ज भरू शकतील. २६ मे रोजी विद्यार्थ्यांनी भरलेला अर्ज महाविद्यालयाकडून तपासून विद्यापीठाकडे पाठविला जाईल.
- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक