
डॉ. मंगला नारळीकरांवरील लेख
ऊर्जेचा खळाळता निर्झर
आपल्या आयुष्याच्या वळणावर अशा काही आदर्श व्यक्ती भेटतात, की त्या व्यक्तीच्या ऊर्जेच्या उत्साहात बकुळ गंधाने आपले आयुष्य ऊर्जेने, उत्साहाने, चैतन्याने रसरशीत होऊन जाते. अचाट कल्पकता, दुर्दम्य उत्साह, स्पष्ट वक्तेपणा, सामाजिक भान, साधी राहणी अशा अनेकविध कलागुणांनी संपन्न व्यक्तिमत्त्व म्हणजे ज्येष्ठ गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर! त्यांनी नुकतेच वयाच्या ८०व्या वर्षात पदार्पण केले असून, त्यांच्या सहवासातील आठवणींना दिलेला उजाळा..
- प्रा. विजया बंगाळ
---
मी सुमारे १७ वर्षांपूर्वी सकाळी फिरायला जात असताना डॉ. मंगला आणि डॉ. जयंत नारळीकर मला भेटत असत. एकदा नमस्कार करत, सरांना आपले ‘प्रेषित’ हे पुस्तक माझ्या मुलाला खूप आवडते, असे सांगितले. हा आमचा पहिला परिचय. ज्येष्ठ नागरिक संघाच्या पंचवटी अंकासाठी डॉ. मंगलाताईंकडे तीन लेख मागितले. लेख तयार झाल्यावर मी येऊन घेऊन जाईल, असे सांगितले. त्या दोघांचेही लेख देते म्हणाल्या. अन् एक दिवस संध्याकाळी घराची बेल वाजली आणि मी दार उघडले तर दारात चक्क नारळीकर दांपत्य! त्यांना पाहून मी क्षणभर भांभावलेच. लेखाचे पाकीट घेऊन ते दोघेही उभे होते. वास्तविक लेख आणणे हे माझे काम. पण ते स्वतः करताना त्यांना कुठलाही संकोच वाटला नाही. जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ज्ञ माझ्या घरी आल्याचा मला प्रचंड आनंद झाला. त्यानंतर दरवर्षी त्या लेख देत राहिल्या.
डॉ. जयंत नारळीकरांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनंदनासाठी योगवर्गातील १० जणी त्यांच्याकडे जाण्याचे ठरले. डॉ. मंगला यांनी सायंकाळी पाच वाजता येण्याचे सांगितले. पण प्रत्यक्ष आम्ही २० जण गेलो. काही महिलांबरोबर त्यांची मुलेही होते. एवढी संख्या असतानाही नारळीकर दांपत्याने सर्वांचे स्वागत केले. सर्वांना बर्फी दिली, विशेष म्हणजे सर्वांना हवे तसे सर्वांसोबत फोटो काढू दिले. पुढे आमच्या योगवर्गालाही त्यांनी भेट दिली. पूर्ण एक तास थांबून राहिल्या आणि दूसऱ्या दिवशी सतरंजी घेऊन वर्गात हजर! सर्व योगप्रकार त्यांनी केले अगदी शीर्षासन सुद्धा त्यांनी केले. शरीराच्या लवचिकतेबरोबर मनाची लवचिकता ही तितकीच! बागेतील कडीपत्ता देत असताना त्यांच्यातील सुगरण पटकन म्हणाली, ‘‘आता आज मी कढी करते!’’
सामाजिक बांधिलकी
ज्येष्ठ नागरिक संघात अध्यक्ष, परीक्षक, उद्घाटक अशा कुठल्याही निमित्ताने बोलविल्यावर त्या आवर्जून येतात. कुठलाही कार्यक्रम लहान की मोठा, हे त्या बघत नाहीत. किंबहुना ‘नाही’ हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नाही. सामाजिक जाणिवेविषयी त्यांचे भान विलक्षण. ग्रामीण भागातील एका शाळेत शिकविण्यासाठी त्या आमच्या बरोबर येत असत. भाजी आणण्यासाठी आल्यावर प्रत्येक भाजीसाठी वेगळी पिशवी त्यांच्या शबनममध्ये असणारच! त्यांच्याकडे येणाऱ्या शालींचा गरम कोट त्या शिवतात. सेवा सुश्रुतेसाठी आलेल्या अशिक्षित बाईंना त्यांनी चक्क लेखन-वाचन शिकविले. डॉ. मंगलाताईंच्या शिकविण्याची ही विलक्षणता! वयाच्या ८०व्या वर्षीही हा अमाप उत्साह कायम आहे. त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हा उत्साह, खंबीरता, कणखरपणा पाहून जीवन जगण्याची नवी ऊर्जा मिळते. त्यांच्या ऊर्जेच्या खळाळत्या निर्झराच्या काठावर उभे राहून शिडकाव झालेले हे मंगलमय तुषार!
---
(लेखिका मराठीच्या प्राध्यापिका आणि योगशिक्षका आहेत)
--
फोटो ः 45408
--------------