आदिवासी चित्रपट महोत्सवाचा समारोप

आदिवासी चित्रपट महोत्सवाचा समारोप

आदिवासी चित्रपट महोत्सवाचा समारोप
पुणे, ता. २४ : बहुरंग संस्थेतर्फे आयोजित सोळावा आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सव नुकताच पार पडला. आदिवासी जीवनाचे अभ्यासक डॉ. हेमंत आपटे आणि ‘हाकारा’ मासिकाचे माजी संपादक गणपत पंडित यांच्या उपस्थितीत महोत्सवाची सांगता झाली. दोन दिवसीय महोत्सवात आदिवासींच्या जीवनावरील लघुपट आणि माहितीपट दाखविण्यात आले. यामध्ये ‘त्याग आम्हाला काय मागता’, ‘अवर ओरिजिनल इनहिबिटंट्स’, ‘बोहाडा’, ‘भिल्ल’, ‘हंटिंग मद हनी’, ‘द वेडा ट्राईब’, ‘वा पैलवान’ आदी माहितीपट व लघुपट दाखवण्यात आले. ‘बहुरंग’चे अध्यक्ष कुंडलिक केदारी यांच्यासह देविदास घुले, राहुल निगडे, राजू भालेराव, विजय गायकवाड, विवेक काटकर, महेंद्र बुऱ्हाडे, धीरज केदारी यांनी संयोजन केले.
----
‘फ्रीमेसनरी’ संघटनेतर्फे ‘ओपन हाऊस’चे आयोजन
पुणे, ता. २४ : ‘फ्रीमेसनरी’ या संघटनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याची संधी देण्यासाठी संघटनेतर्फे ‘ओपन हाऊस’चे आयोजन केले आहे. येत्या रविवारी (ता. २८) सकाळी १० ते सायंकाळी ५ दरम्यान कॅम्प परिसरात पुणे रेस कोर्स जवळील ६ ए एक्झिबिशन रस्त्यावरील फ्रीमेसनरी हॉलमध्ये हे ‘ओपन हाऊस’ होणार आहे. संघटनेसंदर्भात सकाळी १०.३०, दुपारी १ आणि ३.३० या वेळे दरम्यान उपस्थितांना संघटनेचे व्यवस्थापन व कामकाजासंदर्भात माहिती देण्यात येणार आहे. या विषयी माहिती देताना डेप्युटी-डिस्ट्रीक्ट ग्रँड मास्टर देवेश हिंगोरानी म्हणाले, ‘‘फ्रीमेसनरी संघटनेबद्दल असलेली रहस्यमयता कमी करण्याच्या उद्देशाने आम्ही या ओपन हाऊसचे आयोजन केले असून या वेळी सामान्य नागरिकांना लॉजच्या परिसरात प्रत्यक्ष फेरफटका मारता येईल. इतकेच नाही तर फ्रीमेसनरी संघटना व ते वापरत असलेली सूचक चिन्हे व आजच्या काळातील त्यांचे संदर्भ या बद्दलही माहिती देण्यात येईल.’’
----
मराठी गौरवगाथा ग्रंथाचे प्रकाशन
पुणे, ता. २४ ः आजच्या घडीला मराठी माणसाची नकारात्मकता हेच मराठी भाषेसमोरील मोठे आव्हान आहे. भाषेविषयीचे हे मानसिक दारिद्र्य दूर करणे आवश्यक आहे, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. अक्षरभारती संस्थेतर्फे आयोजित मराठी गौरवगीत लेखन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण व मराठी गौरवगाथा ग्रंथप्रकाशन समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित उपस्थित होते. मराठी गौरवगीत लेखन स्पर्धेत विजयी ठरलेल्या विजेत्यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. मराठी गौरवगाथा या ग्रंथाचे प्रकाशनही करण्यात आले. ‘हा ग्रंथ म्हणजे केवळ मराठी भाषेचा गौरव करणाऱ्या नव्या-जुन्या कवींच्या गीतांचा संग्रह नसून महाराष्ट्राचा व मराठी भाषेचा इतिहास सांगणारा हा संदर्भग्रंथ आहे’, असे अक्षरभारतीचे अध्यक्ष माधव राजगुरू यांनी व्यक्त केले. संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीकांत चौगुले यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन वैशाली मोहिते यांनी केले. रत्ना चौधरी यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com