
योगिता भोसले यांच्याकडे नगरसचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार
पुणे, ता. २४ ः पुणे महापालिकेच्या नगरसचिवपदाचा अतिरिक्त पदभार असणारे मुख्य कामगार अधिकारी तथा सहआयुक्त शिवाजी दौंडकर हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे १ जूनपासून नगरसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार आता राजशिष्टाचार अधिकारी योगिता भोसले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबत आदेश काढले आहेत.
सुनील पारखी हे अनेक वर्ष ‘नगरसचिव’ होते. ते आॅगस्ट २०२० मध्ये सेवानिवृत्त झाल्यापासून शिवाजी दौंडकर यांच्याकडे या अतिरिक्त पदभार होता. ते सेवानिवृत्त झाल्यानंतर ही जबाबदारी कोणाला मिळणार, अशी चर्चा सुरू होती. त्यामध्ये आयुक्तांनी ही जबाबदारी योगिता भोसले यांच्याकडे सोपविली आहे.
दरम्यान, महापालिकेची मुख्यसभा, स्थायी समितीसह इतर सर्व समित्यांचे काम कायद्यानुसार चालविण्याचे आणि निर्णय घेण्याचे अधिकार नगरसचिवांना असतात. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय राखणे, कोणाच्या दबावापेक्षा कायद्याला धरून निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे नगरसचिवाची जबाबदारी मोठी आहे.
भरतीमध्ये एकाही अधिकारी पात्र नाही
सुनील पारखी सेवानिवृत्त झाल्यानंतर आयुक्त विक्रम कुमार यांनी भरती प्रक्रिया राबविली. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले असता, २५ जणांनी अर्ज केले. पण, आयुक्तांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्या पदासाठी सक्षम उमेदवार न मिळाल्याने ही जागा रिक्तच राहिली. त्यामुळे दौंडकर यांच्याकडेच अतिरिक्त कार्यभार होता. आता तो भोसले यांच्याकडे दिला आहे. दरम्यान, महापालिकेने पुन्हा पदभरती सुरू केली असल्याने त्यामध्ये आता नगरसचिवपदासाठी पुन्हा एकदा जाहिरात काढली जाण्याची शक्यता आहे.